Ranjitsinh Disale Award : बार्शी येथील जागतिक 'ग्लोबल टीचर' पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय शिक्षक रणजितसिंह डिसले गुरुजींना (Ranjit Singh Disley) आता डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून देण्यात येणारा डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया (DR. APJ KALAM PRIDE OF INDIA AWARDS 2022)   या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. यामुळे  शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण पसरले आहे.  डिसले गुरुजींच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला असून डिसले गुरुजींवर सोलापूर जिल्ह्यासह, राज्यभरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. 


डिसले गुरूजींना तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.  रणजितसिंह डिसले  गुरूजींनी ट्विट करत ही माहिती दिली आहे. 27 जुलैला रामेश्वरम येथे  पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.  दिसले गुरूजीं आपल्या ट्विटमध्ये म्हणाले,  ज्यांनी  आमच्या पिढीला मोठी  स्वप्न पहायला शिकवलं अशा आदरणीय डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून दिला जाणारा पुरस्कार स्वीकारताना अतिशय आनंद होतोय. या पुरस्काराने माझ्यावरील जबाबदारी वाढवली. 






डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांच्या परिवाराकडून डॉ. ए पी जी अब्दुल कलाम प्राईड ऑफ इंडिया हा  पुरस्कार देण्यात येतो. क्रीडा, आरोग्य, शिक्षण, विज्ञाम आणि तंत्रज्ञान, महिला सबलीकरण, संगीत क्षेत्रातील तसेच कोरोना काळात महत्त्वाची जबाबदारी बजवणाऱ्या वॉरियर्सला हा पुरस्कार देण्यात येतो.  


 ग्लोबल टीचर पुरस्कारानंतर रणजितसिंह डिसले यांना अमेरिकन सरकारकडून दिली जाणारी प्रतिष्ठित फुलब्राईट स्कॉलरशिप जाहीर झाली. यासाठी त्यांना सहा महिने अमेरिकेत जाऊन अभ्यास करायचा आहे.  8 ऑगस्टला डिसले गुरूजी यासाठी अमेरिकेला रवाना होणार आहे.  


रणजीत डिसले यांचं कार्य


लेट्स क्रॉस द बॉर्डर या अभिनव शैक्षणिक प्रयोगाच्या माध्यमातून भारत, पाकिस्तान, इराक, इराण, इस्रायल, पॅलेस्टाईन, अमेरिका आणि उत्तर कोरिया या जगातील सर्वात अशांत देशांतील 50000 मुलांची पीस आर्मी तयार करुन परस्पर सौहार्दाचे वातावरण करण्याच्या या शैक्षणिक प्रयोगाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे. तंत्रस्नेही शिक्षणाच्या माध्यमातून शांतता निर्माण करण्याचा हा प्रयत्न इतर देशांतील शिक्षकांना प्रेरणादायी आहे, अशा शब्दात निवड समितीने त्यांचा गौरव केला आहे. रणजीतसिंह डिसले सोलापूर जिल्हा परिषदेच्या परितेवाडीच्या शाळेत मागील 11 वर्षांपासून कार्यरत आहेत.


रणजीत डिसले गुरुजी हे तंत्रज्ञानातील अभिनव प्रयोगांमुळे जगभर ओळखले जातात. जगभरातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना ते ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मार्गदर्शन करत असतात. डिसले गुरुजींनी तयार केलेली QR कोडेड पुस्तके आज 11 देशांतील 10 कोटींहून अधिक मुले वापरत आहेत. व्हर्च्युअल फिल्ड ट्रिप या आगळ्यावेगळ्या अध्यापन पद्धतीच्या माध्यमातून ते 150 हून अधिक देशांतील शाळांमध्ये विज्ञान विषयाचे अध्यापन करतात. अशा पद्धतीने अध्यापन करणारे ते जगातील सातवे शिक्षक ठरले आहेत. याआधी मायक्रोसॉफ्ट, नॅशनल जिओग्राफिक सोसायटी या आंतरराष्ट्रीय संस्थांनी रणजितसिंह डिसले यांच्या कार्याचा गौरव केला आहे.