(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Pune Crime News : औषधाच्या नावाखाली गोव्यातून बिअर अन् विदेशी दारू; तस्करांवर तळेगावमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई
Pune News : औषधाच्या नावाखाली गोव्यातून बीअर आणि विदेशी दारूची तस्करी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने कारवाई करून ट्रकचालकाला अटक केली.
Pune Crime News : औषधांच्या नावाखाली (Pune news) गोव्यातून बिअर आणि विदेशी दारूची तस्करी करत असल्याचं उघडकीस आलं आहे. (Pune Crime News) राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने कारवाई करून ट्रकचालकाला अटक केली. या कारवाईत 65,90,160 रुपयांची दारूही जप्त करण्यात आली. मावळ तालुक्यातील सोमाटणे पाठकर नायकजवळ ही कारवाई करण्यात आली. शंकरलाल नारायण जोशी (46, रा. बस्सी, जिल्हा उदयपूर, राजस्थान) असे अटक केलेल्या ट्रकचालकाचे नाव आहे. त्याच्यासह ओमपुरी नावाच्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गोव्यात उत्पादन करण्यात आलेली आणि विक्रीसाठी परवाना असलेल्या दारूची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सायंकाळी 5 वाजण्याच्या सुमारास सोमाटणे गावच्या परिसरात सापळा रचला. त्यावेळी एका कंटेनर ट्रकला संशयावरून पथकाने अडवले. ट्रकची तपासणी केली असता गोव्यातून औषधी औषधांची वाहतूक करण्याच्या नावाखाली दारूची तस्करी होत असल्याचे समोर आले. विविध ब्रँडची विदेशी दारू आणि बिअरचे एकूण 845 बॉक्स जप्त करण्यात आले. एकूण 65,90,160 रुपये किमतीची विविध प्रकारची विदेशी दारू व बिअर तयार करून विक्रीसाठी जप्त करण्यात आली. दारू आणि वाहनासह 86.16 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पुण्यातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणजितसिंग राजपूत, उपअधीक्षक युवराज शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तळेगाव दाभाडेचे निरीक्षक संजय सराफ, उपनिरीक्षक दीपक सुपे, प्रियांका राठोड, सहायक उपनिरीक्षक सागर धुर्वे, आर.सी.लोखंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली. जवान तात्याबा शिंदे, राहुल जंजाळ, संजय गोरे यांनी ही कारवाई केली.
धडाधड कारवाई सुरु...
मागील काही दिवसांपासून पुणे पोलिसांनी आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून कारवाईचा तडाका सुरु आहे. शहरातील विविध भागांवर मोठ्या प्रकरणात पोलीस करडी नजर ठेवत आहे. अवैध धंद्यासंदर्भात काहीही माहिती मिळाल्यास पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचं पथक सापळा रचून कारवाई करतात. मागील काही महिन्यांपासून कारवाईचा ताडाखाच लावला आहे. गेल्या काही दिवसांपासून पुणे विभागातील राज्य उत्पादन शुल्क विभागाकडू जोरदार कारवाईचा धडाका पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे अनधिकृत मद्यविक्री विरोधात शुल्क विभागाकडून मोठ्याप्रमाणावर कारवाई करण्यात येत आहे. ज्यात सर्वाधिक कारवाई धाबे आणि हॉटेलमध्ये परवाना नसताना दारु विक्री करणाऱ्यांच्या विरोधात करण्यात आल्याचे दिसून येत आहे. त्यासोबतच अवैध दारुची वाहतूक करणाऱ्यांवर केली आहे.