(Source: ECI/ABP News/ABP Majha)
दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT; राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना लेखी आदेश
SIT For Disha Salian Case: राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत.
Disha Salian Death Case SIT: राज्याचं राजकारण ढवळून काढणाऱ्या दिशा सालियान मृत्यू प्रकरणी (Disha Salian Case) अखेर एसआयटी स्थापन केली जाणार आहे. राज्य सरकारकडून (Maharashtra Government) मुंबई पोलिसांना (Mumbai Police) एसआयटी (SIT) स्थापन करण्याचे लेखी आदेश देण्यात आले आहेत. अतिरिक्त पोलीस आयुक्तांच्या नेतृत्वाखाली एसआयटी स्थापन होणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे. दरम्यान, गेल्या हिवाळी अधिवेशनात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी दिशा सालियान मृत्यू प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. अखेर आज मुंबई पोलिसांना एसआयटीसंदर्भात लेखी आदेश देण्यात आले आहेत.
CBI नं दिलेली क्लिन चीट
दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.
आदित्य ठाकरेंचीही चौकशी होणार?
ठाकरे गटाचे (Thackeray Group) आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या अडचणी येत्या काळात वाढणार असल्याचं बोललं जात आहे. राज्य सरकारनं दिशा सालियान प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याचे मुंबई पोलिसांना आदेश दिले आहेत. तसेच, याप्रकरणी आदित्य ठाकरेंचीही चौकशी केली जाणार असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून रंगल्याचं पाहायला मिळत आहे. दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी सातत्यानं काही आमदार करत होते. त्यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात या प्रकरणी SIT चौकशीचे आदेश दिले होते. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सत्ताधाऱ्यांकडून आदित्य ठाकरेंवर सातत्यानं आरोप
दिशा सालियन मृत्यूप्रकरणावरून युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सत्ताधाऱ्यांकडून सतत आरोप केले जात आहेत. दिशा सालियन मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांचं लोकेशन ट्रेस करा, त्यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी सातत्यानं सत्ताधाऱ्यांकडून होत आहे. राणे कुटुंबीयांनी तर या प्रकरणात थेट आदित्य ठाकरे यांचा सहभाग असल्याचा आरोप केला जातोय. परंतु, ठाकरे कुटुंबीयांकडून मात्र या प्रकरणी संयमाची भूमिका घेतली जातेय. आरोप-प्रत्यारोप होत असतानाच साधारणतः वर्षभरापूर्वी या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत केली जाईल, अशी घोषणा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. अशातच आता याप्रकरणी आदित्य ठाकरेंची चौकशी केली जाणार आहे.
दरम्यान, मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.