मूळचा पाकिस्तानी गायक अदनान सामीला जाहीर झालेल्या पद्मश्री पुरस्काराला मनसेने विरोध केला आहे. मनसे चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करुन अदनानला जाहीर झालेल्या पुरस्काराचा मनसेकडून तीव्र शब्दात निषेध केला आहे. याचाच दाखला देत पैलवान खाशाबा जाधव यांच्या मुलाने केंद्र सरकारला सवाल केला आहे. पाकिस्तानी लोकांना पद्मश्री पुरस्कार दिला जातो. मात्र, ऑलिम्पिकच्या दुनियेत ज्यांनी देशाला पहिलं पदक मिळवून दिलं, त्यांना पद्मश्री पुरस्कार मिळत नसल्याची खंत रणजित जाधव यांनी व्यक्त केली आहे. 19 वर्षांपासून संघर्ष करुनही सरकारने दखल न घेतल्याने रणजित जाधव यांनी न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे.
खाशाबा जाधवांच्या 'पद्मविभूषण' शिफारशीची फाईल गहाळ -
कुस्तीपटू खाशाबा जाधव यांचा 'पद्मविभूषण'ने सन्मान व्हावा, म्हणून सरकार दरबारी दिलेली फाईल फडणवीस सरकारच्या काळात गहाळ झाली होती. खाशाबा जाधव यांचे पुत्र रणजीत जाधव यांनी 'एबीपी माझा'ला दिलेल्या मुलाखतीत आपली व्यथा मांडली. खाशाबा जाधव यांना पद्मविभूषण मिळावं, म्हणून पावसाळी अधिवेशनात त्यांच्या कुटुंबीयांनी क्रीडा मंत्री विनोद तावडे यांची भेट घेतली होती. त्यावेळी तावडेंनी आश्वासन दिल्याचं रणजीत जाधवांनी सांगितलं. पुरस्कार मिळण्यासाठी सप्टेंबर महिन्यापर्यंत ऑनलाइन रजिस्ट्रेशन करणं गरजेचं होतं, पण ती प्रक्रिया करण्यात आली नाही. जाधव कुटुंबीयांनी याबाबत क्रीडा विभागाला विचारणा केली असता, ती फाईल गहाळ झाल्याची माहिती मिळाली.
कोण आहेत खाशाबा जाधव?
खाशाबा जाधव हे कुस्तीगीर होते. 1952 साली हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये त्यांनी फ्रीस्टाइल कुस्तीत जिंकलेलं कांस्यपदक हे भारताला स्वातंत्र्योत्तर काळात मिळालेलं पहिलं वैयक्तिक पदक होतं. 1948 मध्ये लंडन ऑलिम्पिकमध्ये फ्लायवेट वजन गटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला होता. भारत सरकारने पद्म पुरस्काराने सन्मानित न केलेले ते एकमेव ऑलिम्पिक पदक विजेते असल्याची माहिती आहे. खाशाबा जाधव यांचा जन्म 15 जानेवारी 1926 रोजी सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातल्या गोळेश्वर गावात एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. 2001 मध्ये त्यांना मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे.
Special Report | देशाच्या पहिल्या ऑलिम्पिक पदकविजेते खाशाबा जाधवांना अजूनही 'पद्म' पुरस्कार का नाही? | ABP Majha