मुंबई : नागपूर मेट्रो उद्घाटनाचा सोहळा आज दिमाखात पार पडला, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, गृहमंत्री अनिल देशमुख, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे या कार्यक्रमासाठी उपस्थित होते. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे या सोहळ्यात सहभाग नोंदवला. तसेच व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नागपूर मेट्रोचं उद्घाटन केलं.


नागपूर मेट्रोच्या उद्घाटनादरम्यान व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे बोलताना मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख 'माझे मित्र देवेंद्र फडणवीस' असा केला. तसेच मुख्यमंत्र्यांनी भाजला कोपरखळी मारण्याची संधी सोडली नाही. 'आपण एका गाडीत बसू शकलो नाही, पण एका स्टेशनवर आलो आहे. यापुढे राज्य व केंद्र सरकारनं मिळून काम केलं, तर महाराष्ट्र-दिल्ली विकासाची मेट्रो सुरू करणं शक्य होईल', असं म्हणत सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपला मुख्यमंत्र्यांनी चिमटा काढला आहे.


पाहा व्हिडीओ :  नागपूर मेट्रोचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन



मेट्रोचं उद्घाटन व्हिडीओ लिंकद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी त्यावेळी भाषण केले, त्यााधी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचं भाषण झालं. त्यावेळी गडकरींनी नागपूरमधील महत्त्वकांशी प्रकल्पाबाबत बोलत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना झालेल्या कामांचं आणि त्यांनी घेतलेल्या निर्णयांचं कौतुक केलं. एवढचं नाहीतर सध्या राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडीच्या सरकारने विकास कामांचे प्रस्ताव केंद्राकडे पाठवावेत असं आवाहनही करायला गडकरी विसरले नाहीत.


नितीन गडकरींच्या भाषणावरूनही मुख्यमंत्र्यांनी त्यांचं नाव न घेता कोपरखळी मारली आहे. 'नितीन गडकरी यांनी वेळेच्या आत काम पूर्ण केलं आहे. तुम्ही म्हणाल असा कसा मुख्यमंत्री आहे. श्रेयच घेत नाही. राजकारणी म्हटल्यावर श्रेयवाद येतोच. पण, आम्हाला श्रेय नकोय, आम्हाला जनतेचे आशीर्वाद हवे आहेत. नागपूरकरांच्या आशीर्वादांची आम्हाला गरज आहे.' असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.


दरम्यान, 5 महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर नागपूरच्या लोकमान्यनगर ते सीताबर्डी मार्गावरच्या मेट्रोचं उद्घाटन सोहळा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते पार पडला. व्हिडीओ लिंकच्या सहाय्याने मुख्यमंत्र्यांनी उद्घाटन केलं. त्यानंतर हिरवा झेंडा दाखवून उपस्थित नेत्यांनी नागपूर मेट्रोचा शुभारंभ केला.


संबंधित बातम्या : 


अशोक चव्हाणांच्या वक्तव्यामुळे महाविकासआघाडीत नाराजीचा सूर


सीएए कायद्यासंदर्भात शरद पवार जाणीवपूर्वक संभ्रम पसरवतायेत : देवेंद्र फडणवीस


Koregaon Bhima | केंद्राच्या निर्णयाबाबत कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेऊन पाऊल उचलणार : गृहमंत्री अनिल देशमुख