सिंधुदुर्ग : कोकणातील सिंधुदुर्ग, रायगडमधील समुद्रकिनाऱ्यावर आजपासून म्हणजे 26 मेपासून 31 ऑगस्टपर्यंत जलक्रीडा प्रकार आणि किल्ला प्रवासी होडी वाहतूक बंद राहणार आहे. तसंच मुरुड इथला जंजिरा किल्ला पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. मेरीटाईम बोर्डाने याबाबत निर्णय घेतला आहे. परंतु या निर्णयामुळे व्यावसायिक आणि पर्यटकांमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग तसंच रायगड किनारपट्टी भागातील गजबजलेली पर्यटन स्थळं आजपासून बंद होणार आहेत. परिणामी कोकणातील आर्थिक उलाढालीला ब्रेक लागला आहे.


दरम्यान या बंदी कालावधीतही व्यावसायिकांनी वॉटर स्पोर्ट्स  किंवा बोटिंग सुरु ठेवल्याचं दिसल्यास संबंधितांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही मेरीटाईम बोर्डाच्या अधिकार्‍यांनी दिला आहे.


वॉटर स्पोर्ट्ससाठी पर्यटकांची कोकणाला पसंती असते. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील समुद्र किनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग, बनाना राईड, जेट स्की, पॅरासेलिंग या साहसी समुद्री खेळांचा आनंद लुटण्यासाठी येतात. 


दरम्यान हा निर्णय मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनाऱ्यावरील बोट दुर्घटनेमुळे घेतलेला नाही. ही नियमित प्रक्रिया असून पावसाळा आणि समुद्रात उसळणाऱ्या लाटांच्या पार्श्वभूमीवर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवणमधील तारकर्ली समुद्रकिनारी झालेल्या बोट दुर्घटनेत दोन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी दोन बोट मालकांसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.


उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेलं निळंशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणाचं अनेकांना आकर्षण असतं. यातच कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे भर उन्हातही कोकण हवाहवासा वाटतो. त्यामुळे सुट्ट्यांमध्ये अनेक जण कोकण पर्यटनाचा प्लॅन करतात. परंतु कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून कोकणातील पर्यटन बंद होतं. कोरोनाचे निर्बंध उठल्यानंतर पर्यटय व्यवसाय रुळावर येत होता. कोकणातील सर्वच समुद्रकिनारे पर्यटकांनी फुलून गेले होते. देश- विदेशातून पर्यटकांन भेट दिल्याने व्यवसाय तेजीत होता. आता हंगाम संपत आल्याने पर्यटन व्यावसायिकांनी आपल्या बोटी किनार्‍यावर आणण्यास सुरुवात केली आहे. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात समुद्राला भरती येते त्यामुळे पर्यटनास बंदी असते. 


संबंधित बातम्या