सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील तारकर्ली समुद्र किनाऱ्यावर पर्यटनासाठी गेलेली बोट बुडाली. 20 पर्यटक घेऊन स्कुबा डायव्हिंग करुन परतीच्या मार्गावर असताना समुद्र किनाऱ्यापासून जवळ बोट आली असता बोट बुडाली. यामध्ये दुर्घटनेट दोघांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. जय गजानन नावाची ही बोट आहे. आज दुपारी ही दुर्घटना घडली.


आकाश देशमुख (अकोला) आणि स्वप्निल पिसे (पुणे) अशी मृतांची नावं आहेत.


तारकर्ली येथील जय गजानन नावाची 20 पर्यटकांना घेऊन स्कुबा डायव्हिंगसाठी गेली होती. स्कुबा डायव्हिंग करुन परत येताना आज दुपारी 12.30 वाजताच्या दरम्यान MTDC रिसॉर्ट इथल्या किनाऱ्यावर आणत असताना बोट बुडाली. यात दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला. तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. बोटीतील इतर सर्व पर्यटकांना वाचवण्यात यश आलं आहे. प्रशासनाने या दुर्घटनेची गंभीर दखल घेतली असून बोट मालक आणि चालकावर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.


बोटीची प्रवासी क्षमता किती होती, या सर्व पर्यटकांना लाईफ जॅकेट देण्यात आले होते का हे तपासण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. पोलीस आणि जिल्हाधिकारी घटनास्थळी हजर आहेत. या दुर्घटनेत कोणताही हलगर्जीपणा झाला असेल तर चालक आणि मालकावर कारवाई केली जाईल, असं सांगितलं जात आहे.  


लाटांमुळे बोट कलंडली : बोटीतील प्रत्यक्षदर्शी पर्यटक
बोटीत 15 ते 20 जण होते. साडेबारा वाजून गेले होते. समुद्रात मोठ्या लाटा निर्माण झाल्या होत्या. या लाटांपासून बचाव करण्यासाठी प्रयत्न सुरु होता. पण तो यशस्वी झाली. त्यातच लाट बोटीवर आली आणि बोट एका बाजूने कलंडली. बोट दोन तीन वेळा फिरली. लाटांमुळे बोट खाली दबली जात होता. याचवेळी अनेकांच्या नाका-तोंडात पाणी गेलं, अशी माहिती बोटीतील प्रत्यक्षदर्शी पर्यटकाने दिली.


स्कुबा डायव्हिंगसाठी लोकप्रिय तारकर्ली बीच
महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ल्याशेजारी असणारी तारकर्ली हे ठिकाण स्कुबा डायव्हिंगसाठी अतिशय लोकप्रिय आहे. महाराष्ट्रात स्कूबा डायव्हिंग करायची असल्यास तारकर्ली बीचला पहिली पसंती दिली जाते.तारकर्ली समुद्रकिनाऱ्याचं स्वच्छ पाण्यामुळे समुद्रातील जैवविविधता पाहायला मिळते. इथे स्कुबा डायव्हिंगसाठी पर्यटकांना स्पीड बोटने नेलं जातं. स्कुबा डायव्हिंग करुन त्याच बोटीने परत आणलं जातं.  


अशाचप्रकारे स्कूबा डायव्हिंग करुन परत येताना समुद्रकिनाऱ्याच्या जवळ ही बोट बुडून अपघात झाला. ज्यात दोन पर्यटकांना प्राण गमवावे लागले. स्कुबा डायव्हिंगचा भन्नाट अनुभव आणि आनंद देणाऱ्या तारकर्लीमध्ये या घटनेने गालबोट लागलं आहे.