मुंबई : मराठा आंदोलनाच्या (Maratha Reservation Protest)  पार्श्वभूमीवर बुधवारपासून ठाणे पोलिसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राहत (CM Eknath Shinde) असलेल्या लुईस वाडी भागात पोलीस बंदोबस्त वाढवला शिवाय या भागातील रस्ताही बंद करण्याची अधिसूचना काढली. खासदार श्रीकांत शिंदे (Dr. Shrikant Shinde) आणि त्यांच्या कुटुंबियांचा येण्या जाण्याचा रस्ता असल्याने अधिसूचना काढली जात असल्याचे यामध्ये म्हटले होते. सोशल मीडिया आणि विरोधकांकडून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली. या प्रकरणी रात्री उशिरा खासदार शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही, असे म्हणत रस्ता वाहतुकीसाठी पूर्वीप्रमाणेच खुला ठेवावा; अशी विनंती  खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी ठाण्याच्या पोलिस आयुक्तांनी केली आहे.  खासदार संजय राऊतांनी देखील यावरून टीका केली होती. 


डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले,  ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने मुख्यमंत्र्याचे शुभदिप हे निवासस्थान असलेल्या लुईसवाडी परिसरातील वाहतूक बदलांसाठीचे एक परिपत्रक बुधवारी जारी केले आहे. त्या पत्रकात  मुख्यमंत्र्यांच्या कुटुंबियांसाठी म्हणजे आमच्यासाठी वाहतूक बदल प्रस्तावित केल्याचा उल्लेख आहे. त्यात माझ्या नावाचाही स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने आमच्या निवासस्थान परिसरातील वाहतुकीत बदल करण्याबाबतची कोणतीही विनंती किंवा सूचना मी किंवा आमच्या कुटुंबियांनी केलेली नव्हती. तसेच, अशा पद्धतीने पत्रक जारी करण्यापूर्वी आम्हाला पूर्वकल्पनाही देण्यात आली नव्हती.


ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय


वाहतूक विभागाने परस्पर काढलेल्या या पत्रामुळे प्रसिद्धी माध्यमे आणि सोशल मीडियावर आमच्या कुटुंबियांची नाहक बदनामी केली जात आहे. चूक पोलिसांची आणि खापर आमच्या माथी अशी अत्यंत संतापजनक परिस्थिती त्यामुळे उद्भवली आहे. आमचे येणे- जाणे सुकर व्हावे यासाठी सर्वसामान्य जनतेचा रस्ता अडविण्याचा अधिकार आम्हाला मुळीच नाही. ते व्हीआयपी कल्चर आम्हाला मुळीच मान्य नाही. तसेच, सुरक्षेच्या कारणास्तव अशा पद्धतीने वाहतूक बदल करून ठाणेकरांना त्रास देण्याचा पोलिसांचा प्रयत्नही अनाकलनीय आहे. आमच्या सुरक्षेसाठी आम्ही योग्य ती खबरदारी घेतोय. परंतु, पोलिसांनी उत्साहाच्या भरात अशा पद्धतीने वाहतूक बदल करण्याचा जो प्रताप केला आहे तो निश्चितच योग्य नाही, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.


अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करा


पोलिसांच्या या पत्रकबाजीमुळे  आमच्या कुटुंबियांना जो मनस्ताप सहन करावा लागलाय याची कल्पना पत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांना कदाचीत नसावी. त्यामुळे आम्हाला कोणतीही कल्पना नसताना परस्पर अशा पद्धतीने वाहतूक बदलाचे परिपत्रक काढणाऱ्या अधिकाऱ्यांवर आपण कठोर कारवाई करावी. तसेच, यापुढे अशा पद्धतीने कोणतेही परिपत्रक काढले जाणार नाही याबाबतची समज संबंधित अधिकाऱ्यांना आपण द्यावी. तसेच, हा रस्ता वाहतूकीसाठी पूर्वीप्रमाणेच खुला ठेवावा अशी विनंती देखील श्रीकांत शिंदेंनी केली आहे.


काय म्हणाले संजय राऊत?


मुख्यमंत्र्याचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे व त्यांच्या कुटुंबाला ये जा करण्यासाठी ठाण्यातील अख्खा सर्विस रोड बंद केला जातो. हे जरा अतीच झाले असे वाटत नाही का? गृहमंत्री जी! पोलिस खात्याची मिंधेगिरी!


 


हे ही वाचा :


Kalyan Lok Sabha Election: कल्याण लोकसभेची जागा कोण लढवणार? बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर श्रीकांत शिंदेंची धाकधूक वाढली