Eknath Shinde and MLA reached Assam Guwahati : राज्याच्या राजकारणात अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड पुकारला आहे. कालपासून बंडाच्या पवित्र्यात सूरतमध्ये असलेल्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना आमदारांना आज भल्या पहाटे सूरतहून एअरलिफ्ट करण्यात आलं. सूरत विमानतळावरून एका चार्टर विमानानं हे सर्व आमदार गुवाहाटीला रवाना झाले होते. मध्यरात्री अडीच वाजता शिवसेना आमदारांना घेऊन एक बस मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाली होती. त्यानंतर हे सर्व आमदार विमानानं आसामधील गुवाहाटीत दाखल झाले. 


गुवाहाटी विमानतळावर दाखल होताच एकनाथ शिंदेंनी पुन्हा एकदा माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चार केला. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले की, "शिवसेनेचे 40 आमदार माझ्यासोबत आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आणि त्यांची भूमिका पुढे घेऊन जाणार आहोत." पुढे बोलताना ते म्हणाले की, मला कोणावरच टीका टिप्पणी करायची नाही. शिवसेनेचे आमदार माझ्यासोबत इथे उपस्थित आहेत. बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व आम्ही सर्वजण पुढे घेऊन जाणार आहोत." तसेच, सध्या 40 आमदार माझ्यासोबत आहेत आणखी 10 आमदार इथे येणार असल्याचंही एकनाथ शिंदे यांनी सांगितलं आहे.  


याआधी सूरतमधील मेरिडियन हॉटेलवरून विमानतळावर दाखल झाल्यानंतर एकनाथ शिंदेंनी पहिल्यांदा माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी सेना आमदारांनी कोणतंही बंड  केलेलं नाही किंवा आम्ही पक्षही सोडलेला नाही, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेणार असल्याचा पुनरुच्चारही एकनाथ शिंदेंनी केला. दरम्यान भाजपचे मोहीत कंबोज सर्व आमदारांसह गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती आहे. तसेच, सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या इतर आमदारांसोबत भाजपचे काही पदाधिकारी जे देवेंद्र फडणवीसांचे निकटवर्तीय समजले जातात ते देखील उपस्थित होते. 


एकनाथ शिंदेंसोबतच्या आमदारांचा फोटो व्हायरल


शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे हे आता स्वतंत्र गट स्थापन करण्याची आता दाट शक्यता निर्माण झाली आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांचा फोटो व्हायरल झाला आहे. शिंदे यांनी स्वतंत्र गटासाठी आवश्यक असलेली 37 ही संख्या पूर्ण केली असल्याचे सध्या चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे मुंबईत दाखल झाले आहेत. आज भाजप आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आले असल्याची माहिती आहे. त्यामुळे राज्यात मोठ्या घडामोडी घडणार आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :