Gujarat Air India Flight Crash: नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या फ्लाइट AI-171 च्या विमान अपघाताबाबत एक मोठी अपडेट जारी केली आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, विमान अपघातानंतर तपास वेगाने केला जात असून दोन्ही ब्लॅक बॉक्समधून (CVR आणि FDR) महत्त्वाचा डेटा यशस्वीरित्या काढण्यात आला आहे. आता तांत्रिक तज्ञांच्या देखरेखीखाली त्यांची चौकशी केली जात आहे, जेणेकरून अपघाताची कारणे स्पष्टपणे शोधता येतील.
13 जून 2025 रोजी झालेल्या या विमान अपघातानंतर लगेचच, विमान अपघात तपास ब्युरो (AAIB) ने आंतरराष्ट्रीय मानकांनुसार एक तज्ञ पथक तयार केले. या पथकाचे नेतृत्व AAIB चे महासंचालक करतात. या पथकात विमान वाहतूक वैद्यकीय तज्ञ, हवाई वाहतूक नियंत्रण (ATC) अधिकारी आणि यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) चे प्रतिनिधी देखील समाविष्ट आहेत, कारण विमान अमेरिकेत बनवले गेले होते. तपासाचे प्रत्येक पाऊल भारताच्या कायद्यांनुसार आणि आंतरराष्ट्रीय नियमांनुसार पारदर्शकतेने उचलले जात असल्याची माहिती देण्यात आली आहे.
आतापर्यंत काय काय घडलं?
1) 13 जून रोजी अपघातस्थळी असलेल्या इमारतीच्या छतावरून पहिला ब्लॅक बॉक्स, म्हणजेच कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) सापडला.
2) 16 जून रोजी विमानाच्या ढिगाऱ्यातून दुसरा ब्लॅक बॉक्स, म्हणजेच फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) काढण्यात आला.
3) दोन्ही ब्लॅक बॉक्स अहमदाबादमध्ये कडक पोलीस सुरक्षा आणि सीसीटीव्ही देखरेखीखाली सुरक्षित ठेवण्यात आले.
4) 24 जून 2025 रोजी, दोन्ही ब्लॅक बॉक्स भारतीय हवाई दलाच्या विशेष विमानाद्वारे अहमदाबादहून दिल्लीला आणण्यात आले.
5) पहिला ब्लॅक बॉक्स दुपारी 2 वाजता AAIB लॅबमध्ये पोहोचला, तर दुसरा बॉक्स AAIB टीमने संध्याकाळी 5.15 वाजता पोहोचवला.
अपघातापूर्वी कोणत्या हालचाली सुरू होत्या?
24 जून रोजी संध्याकाळपासून, AAIB आणि NTSB च्या तांत्रिक तज्ञांनी ब्लॅक बॉक्समधून डेटा काढण्याची प्रक्रिया सुरू केली. यानंतर, 25 जून रोजी मेमरी मॉड्यूलमधून डेटा यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला. आता CVR आणि FDR या दोन्ही रेकॉर्डर्सच्या डेटाचे बारकाईने विश्लेषण केले जात आहे. अपघातापूर्वी कोणत्या हालचाली सुरू होत्या आणि तांत्रिक किंवा मानवी चूक हे अपघाताचे कारण आहे का?, याबाबत शोध घेतला जात आहे.
ब्लॅक बॉक्स म्हणजे काय?
सर्वात पहिले विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रेकॉर्डिंग डिव्हाइस असते, ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केले जाते. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.
ब्लॅक बॉक्स कोण शोधतं?
विमान अपघातानंतर ब्लॅक बॉक्स ही त्या अपघाताशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी एक अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाची गोष्ट ठरते. विमान अपघातानंतर त्याच्या तपासासाठी खास प्रशिक्षण दिलेली एअर क्रॅश तपासणी टीम ब्लॅक बॉक्स शोधण्याचे काम करते. विमान वाहतूक महासंचालनालय (DGCA) आणि एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्वेस्टिगेशन ब्युरो (AAIB) यांच्या वतीने या टीम्स पाठवण्यात येतात. यामध्ये अनेक वेळा नौदल किंवा विशेष बचाव पथक देखील सहकार्य करते.