India Wheat Production : भारतातील गहू उत्पादनाची (Wheat Production) अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. कडक उष्णतेमुळे, भारतात 20 वर्षांपेक्षा जास्त काळातील सर्वात कमी गव्हाचे उत्पादन झाले आहे. पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेश या गव्हाचे सर्वाधिक उत्पादन देणाऱ्या राज्यांमध्ये यंदा उत्पादन चांगले आले नाही. कडक उन्हामुळे गव्हाची पिके करपून गेली आहेत.


सूर्यप्रकाशामुळे गव्हाची पिके तपकिरी झाली आहेत. एका अहवालानुसार, पंजाबमधील एका जिल्ह्यातील पिके सोनेरी पिवळ्या ते तपकिरी रंगात बदलली आहेत. कडक उन्हात पिके आणि धान्ये कमी होण्याचे ही लक्षणं असल्याचं एका गहू उत्पादक शेतकऱ्याने सांगितलं आहे.


2010 पासून प्रचंड नुकसान


पंजाब, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये गव्हाच्या उत्पादकतेत दोन दशकांत सर्वाधिक घट झाली आहे. या वर्षीचे नुकसान 2010 पेक्षा मोठे आहे. 2010 मध्ये हीच उष्णतेची लाट दिसली होती. गव्हासारख्या मुख्य पिकावर हवामानाचा घातक परिणाम दीर्घकालीन भारताच्या अन्नसुरक्षेसाठी चांगला नाही असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.


काय परिणाम होईल?


पीक कापणी प्रयोगाच्या आधारे शास्त्रज्ञांनी गव्हाच्या उत्पादनाशी संबंधित आकडेवारी जाहीर केली आहे. ही पद्धत शास्त्रज्ञांना उत्पादन निश्चित करण्यास आणि पीक नुकसानाचे मूल्यांकन करण्यास मदत करते. त्याचे दीर्घकालीन परिणाम दिसून येतात, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. 


ज्या भागात गव्हाचे उत्पादन जास्त आहे ते भौगोलिकदृष्ट्या प्रभावित होऊ शकतात. याशिवाय आर्थिक दृष्टिकोनातून पाहिले तर त्याचा परिणाम सर्वसामान्यांच्या बजेटवर होऊ शकतो. कमी उत्पादन म्हणजे बाजारात गव्हाचा तुटवडा आणि भाव वाढणे. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. 


प्रतिक्विंटल 12 ते 18 हजार रुपयांचे नुकसान झाले असून कर्जबाजारी झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रति हेक्टर उत्पादन सुमारे 20 टक्क्यांनी घटले असल्याचे शेतकऱ्यांनी म्हटलं आहे


आणखी घट होईल?


तापमानात 2.5 ते 4.9 अंश सेल्सिअस वाढ झाल्यामुळे गव्हाचे उत्पादन 41-52 टक्क्यांनी कमी होऊ शकते असं 2016 मध्ये प्रकाशित झालेल्या एका सरकारी अहवालात म्हटले आहे. ओस्लो येथील सेंटर फॉर इंटरनॅशनल क्लायमेट रिसर्च येथे पोस्ट केलेल्या एएस दलोज यांच्या नेतृत्वाखाली हवामान बदलावरील संशोधन जर्नल ऑफ अॅग्रिकल्चर अँड फूड रिसर्चमध्ये हा अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. 


या अहवालानुसार भारतातील गंगेच्या मैदानात वाढत्या उष्णतेचा परिणाम दिसून येईल. महत्त्वाचे म्हणजे, हे असे क्षेत्र आहे जे जगातील प्रमुख गहू उत्पादक प्रदेशांपैकी एक आहे.