Shivsena Internal Disput : शिवसेना नेते आणि माजी मंत्री रामदास कदम यांच्याविरोधात पक्षप्रमुख आणि शिवसेना नेते नाराज असल्याची चर्चा आहे. त्यामध्ये आता रामदास कदम यांचं नेतृत्व राहतं की, जातं? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. रामदास कदम हे विधानपरिषदेचे आमदार आहेत. त्यांची विधान परिषदेची मुदत जानेवारी 2022 ला संपतेय, त्यांचे सदस्यत्व पुढे कायम ठेवलं जाणार नाही, अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय. तसेच रामदास कदम यांच्या जागी नव्या चेहऱ्यांचा शोध सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ज्यांचा पक्षाला उपयोग होईल, जो तळागाळात लोकांशी संपर्कात असेल आणि जो पक्षाच्या नियमावलीच्या पुढे जाणार नाही, असा कार्यकर्ता शोधण्याचं काम सध्या सुरु आहे. त्यात मुंबईच्या काही विभागप्रमुख किंवा युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांची सुद्धा वर्णी लागू शकते. 


2005 मध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी नारायण राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राणे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते आणि त्याआधी ते मुख्यमंत्रीही होते. त्यामुळे साहजिकच शिवसेनेत ठाकरे कुटुंबियांनंतर राणे हे सर्वात महत्वाचे व्यक्ती होते. असंच मानलं जात होतं. राणेंकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार? याची जोरदार चर्चा होती. कारण त्या पदावर बसणारा व्यक्ती हा शिवसेनेतील सर्वात महत्वाचा व्यक्ती ठरणार होता. राणेंनंतर ते पद गेलं रामदास कदमांकडे... त्यानंतर रामदास कदम हे 2005 ते 2009 पर्यंत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून रामदास कदमांना महाराष्ट्र ओळखायचा. 


2005 मध्ये त्यांची शिवसेना नेतेपदी निवड झाली. सलग चारवेळा विधानसभेवर निवडून गेलेल्या रामदास कदमांचा 2009 मध्ये मात्र पराभव झाला होता. तेव्हा रामदास कदमांचं काय होणार, अशी चर्चा रंगली होती. मात्र पक्षाने त्यांना विधानपरिषदेवर पाठवत मोठी संधी दिली. 2010 मध्ये रामदास कदम विधानपरिषदेवर निवडून गेले. 2014 मध्ये फडणवीस सरकारमध्ये त्यांना पर्यावरण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली. 2016 मध्ये पुन्हा त्यांची विधानपरिषदेवर वर्णी लावण्यात आली. 2019 मध्ये त्यांचे सुपुत्र योगेश कदम हे दापोली मतदारसंघातून निवडून आले आहेत. शिवसेनेचा कोकणातील चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. कोकणात राणेंना टक्कर देणारा नेता म्हणून रामदास कदम हे नाव घेतलं जातं. शिवसेनेतील पहिल्या फळीतील एक आक्रमक आणि वजनदार नेते म्हणून रामदास कदम यांची आजही महाराष्ट्रात ओळख आहे. 


आता हेच रामदास कदम एका प्रकरणामुळे अडचणीत आले आणि शिवसैनिकांचा रोष त्यांना सहन करावा लागला. दसरा मेळाव्यातही येण्याच त्यांनी टाळलं. रामदास कदम यांची एक कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानं ते चर्चेत आलेत. कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्यांना काही माहिती पुरवल्याचं या क्लिपमध्ये संभाषण आहे. या कथित ऑडिओ क्लिपमुळे रामदास कदम यांच्या पक्षांतर्गत अडचणी वाढण्याची शक्यता आहे. रामदास कदमांनी हे आरोप फेटाळले आहेत. मात्र तरीही दसरा मेळाव्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या समोर काही शिवसैनिकांनी रामदास कदम यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. 


रामदास कदम यांनी यापुढे निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला होता. फक्त पक्षाचं काम करणार असं त्यांनी जाहीर केले होतं. आता पक्षांतर्गतच कुरघोडी झाल्याने त्यांना पक्षातही काम करता येईल की नाही, याबाबतही शंका व्यक्त केली जात आहे. परब यांना अडचणीत आणल्यामुळे ही शिक्षा केली जाणार असल्याचंही बोललं जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


ठाकरे सरकारचं मिशन 'दिवाळी'; मुख्यमंत्री आज महत्वाची घोषणा करण्याची शक्यता