Shivsena History : राज्यात सुरु असणारं राजकारण सत्तांतराचा दिशेनं जातंय की, काय असे प्रश्न आता निर्माण होऊ लागले आहेत. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या आणि निकालानंतर अचानकच शिवसेनेचे काही आमदार आणि मंत्री गायब झाले. सगळीकडे फोनाफोनी सुरु झाली आणि एक धक्कादायक बातमी समोर आली. शिवसेनेचे वरिष्ठ नेते, बाळासाहेब ठाकरे यांचे जवळचे शिलेदार एकनाथ शिंदे (Eknath Shinde) देखील नॉट रिचेबल होते.
दुसऱ्याच दिवशी बातमी आली की, एकनाथ शिंदे 12-15 आमदारांना घेऊन गुजरातच्या सूरत येथील Meridian हॉटेलमध्ये थांबले आहेत. एकनाथ शिंदे यांनी बंड केला हे स्पष्ट झालं अन् शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला. शिवसेनेत उभी फूट पडली आणि महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं. सूरतहून त्यांच्या मोर्चा रातोरात वळला तो आसामच्या गुवाहाटीला आणि आधी 12, नंतर 20 पुढे 25 असं करत जवळपास 35 शिवसेना आमदारांनी एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला. स्वतः उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना भावनिक साद घातली. मात्र त्याचाही फारसा काही फरक पडला नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे प्रतिशिवसेना तयार करतात की, काय या चर्चांनाही उधाण आलं. मात्र शिवसेनेत बंड होण्याची ही काही पाहिली वेळ नाही आणि प्रतिशिवसेनेची स्थापना देखील काही पहिल्यांदाच होत नाही. हा प्रयोग आधी सुद्धा झालाय.
वर्ष होतं 1969 सालचं... नुकत्याच पार पडलेल्या मुंबई मनपा निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश मिळालं. पक्षाचे तब्बल 40 उमेदवारी एकाच फटक्यात निवडून आले. याच यादीतील एक नाव म्हणजे, भाई शिंगरे. भाई शिंगरे यांचे बंधू बंडू शिंगरे यांचा लालबाग-परळ परिसरात चांगलाच दबदबा होता. दादागिरीतही ते इतरांपेक्षा एक पाऊल पुढेच होते. 1970च्या दक्षकातील गोष्ट, महागाई चांगलीच वाढली होती आणि सर्वसामान्यांचे हाल होत होते. याचं एक कारण होतं साठेबाजार. दरम्यान चोरबाजार येथील डंकन रोडवरील कांद्या-बटाट्याची काही गोदामं फोडून शिवसैनिकांनी मुंबईकरांना स्वस्त दराने कांदे-बटाटे उपलब्ध करून दिले होते. त्यावेळी बंडू शिंगरे यांच्यावर पैशांच्या अफरातफरीचा आरोप झाला आणि बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना पक्षाच्या भर बैठकीतून बाहेर काढलं. बंडू शिंगरे चांगलेच खवळले आणि त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांना आपल्या रडारवर ठेवलं. त्यानंतर ते नेहमीच बाळासाहेब ठाकरेंच्या विरोधात बोलू लागले.
बंडू शिंगरे इथंच थांबले नाही तर बाळासाहेबांना विरोध करण्यासाठी त्यांनी प्रतिशिवसेनेची स्थापना केली आणि स्वतःला प्रतिशिवसेनाप्रमुख अशी उपाधी सुद्धा लावली. मात्र बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखं वागणं काही बंडू यांना जमलं नाही आणि काहीच दिवसांत त्यांची प्रतिशिवसेना मरगळली आणि शिवसेनेला खिंडार पडण्याचा त्यांचा हा प्रयोग फसला.
पुढे 1975 च्या आणीबाणीनंतर 1977 साली देशात लोकसभेच्या निवडणूक लागल्या आणि जनता पक्षाचा मोठा विजय झाला. इंदिरा गांधी यांचा दारुण पराभव झाला होता. दरम्यान जनता पक्षाची विजय सभा पार पडली ती दादरच्या शिवाजी पार्कवर. ती सभा झाल्यानंतर तिथून बाहेर पडणाऱ्या जमावानं शिवसेनेच्या कार्यालयावर म्हणजेच, शिवसेना भवनवर हल्ला चढवला. समोरच्या दिशेनं इमारतीवर तुफान दगडफेक करण्यात आली होती आणि शिवसेना भवनाचं मोठं नुकसान झालं. या दगडफेकीतही बंडू शिंगरे यांचा हात असल्याचं अनेकदा बोललं गेलं.
बंडू शिंगरे यांच्याबाबतचा अजून एक किस्सा म्हणजे, 1974 साली मुंबईच्या दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात लोकसभेची पोट निवडणूक लागली होती. काँग्रेसनं इथं अॅडव्होकेट रामराव अदिक (Ramrao Adik) यांना उमेदवारी दिली तर कम्युनिस्ट पक्षानं श्रीपाद डांगे यांच्या कन्येला म्हणजेच, रोझा देशपांडे यांना उमेदवारी दिली.
बाळासाहेब ठाकरे यांना ही लोकसभा निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र काँग्रेसनं रामराव अदिक यांना दिलेल्या उमेदवारीमुळे बाळासाहेब ठाकरे पेचात पडले. याचं कारण म्हणजे, रामराव अदिक यांनी सुरुवातीच्या काळात शिवसेनेला फार मदत केली. 30 ऑक्टोबर 1966 रोजी झालेल्या शिवसेनेच्या पाहिल्या वाहिल्या मेळाव्यातसुद्धा रामराव आदिक यांनी भाषण केलं होतं. अदिक यांच्या महाराष्ट्र हितवर्धिनी या संघटनेची वैचारिक नाळ ही शिवसेनेशी जुळली होती आणि म्हणूनच ते शिवसेनेच्या पाठीशी नेहमी उभे राहिले. अशा प्रसंगी आपला उमेदवार रामराव अदिक यांच्या विरोधात देणं बाळासाहेब ठाकरेंच्या तत्वात बसत नव्हतं.
मात्र याच जागेसाठी लालबाग भागांतील शिवसेनेचे शाखाप्रमुख बंडू शिंगरे आग्रही होते आणि त्यांनाही निवडणूक लढवायची होती. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांना अनेक वेळा याबाबत सांगितलं ही मात्र बाळासाहेबांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आणि रामराव अदिक यांना जाहीर पाठिंबा दिला. बंडू शिंगरे यांना उमेदवारी न मिळाल्यानं आणि पक्षाच्या तत्वांविरोधात जाऊन काँग्रेसच्या उमेदवाराला समर्थन दिल्यानं ते नाराज झाले होते आणि त्यांनी हिंदूमहासभेच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला.
असो, पण येत्या काही दिवसांत एकनाथ शिंदे प्रतिशिवसेनेची स्थापना करतात का? आणि केलीच तर 'ठाकरे' या ब्रँडचं काय होणार? हे नक्कीच पाहण्यासारखं असणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :