विधानसभा निवडणूक 2019: शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबरला होणार : सूत्र
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेची सांगता 19 सप्टेंबरला होणार आहे सोबतच याच दिवशी शिवसेना-भाजपच्या युतीची घोषणादेखील केली जाणार आहे.
मुंबई: विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना-भाजप युतीची घोषणा 19 सप्टेंबर रोजी होण्याची शक्यता आहे. आज साताऱ्यात असलेली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा सध्या तिसऱ्या टप्प्यात आहे आणि यात्रेची सांगता 19 सप्टेंबरला नाशिकमध्ये होणार आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उपस्थित असतील. त्यांच्या उपस्थितीतच शिवसेना-भाजप युतीची घोषणा होण्याची शक्यता असल्याचं भाजपचे उपाध्यक्ष प्रसाद लाड यांनी म्हटलं.
येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेची युती होणारच असं दोन्ही पक्षांकडून सांगितलं जात होतं. शिवसेनेचा 50-550 फॉर्म्युलाचा आग्रह भाजपला काही पसंतल नाही, भाजप 174 आणि शिवसेनेला 114 जागा अशा प्रस्तावावर भाजप नेतेही ठाम आहेत, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. आपापल्या फॉर्म्युल्यावर दोन्ही पक्ष ठाम असल्यामुळे युतीचा गुंता कायम असल्याचं पाहायला मिळतंय.
दोन्ही पक्षांनी144-144 जागा वाटून घेण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तर घटक पक्षांना देण्यात येणाऱ्या 18 जागांपैकी 9-9 जागा दोन्ही पक्षांनी आपल्या कोट्यातून द्याव्यात, अशी शिवसेनेची मागणी असल्याचं समोर येत आहे.
स्वर्ग बदलण्याची स्पर्धा लोकशाहीचा नरक करेल, पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर संजय राऊतांची 'रोखठोक' भूमिका
जागांचा तिढा सुटत नसल्याने शिवसेना नेत्यांची मातोश्रीवर महत्त्वाची बैठक सुरु आहे. बैठकीला शिवसेनेचे खासदार, आमदार आणि पदाधिकारी उपस्थित आहेत. एकीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या जोरबैठका सुरु आहेत, सोबकच शिवसेनाही या बैठकीच्या माध्यमातून 288 जागांसाठी चाचपणी करणार असल्याची चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीतील जागावाटप आणि फॉर्म्युल्याबाबत दोन्ही पक्षातील नेत्यांमध्ये चर्चा होत आहेत. मात्र शिवसेना-भाजप युतीच्या जागावाटपाचा अंतिम चर्चा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे पी नड्डा यांच्यात होणार आहे. तर अंतिम निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह घेणार आहेत, असं बोललं जात आहे.
शिवसेनेतील इच्छुकांच्या मुलाखती, युतीबद्दल शिवसैनिकांना काय वाटतं?
भाजप-शिवसेना युती मित्रपक्षांना कोणत्या 18 जागा देणार?