रत्नागिरी : विधानसभेचे अध्यक्षपद मला मिळावं असं महाविकास आघाडीतल्या तिन्ही पक्षांना वाटतंय असं महत्वपूर्ण वक्तव्य शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी केलं आहे. ते चिपळून येथे पत्रकार परिषदेत बोलत होते. विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या काळात तालिका सभापती म्हणून काम करताना भास्कर जाधव यांनी गैरवर्तन करणाऱ्या भाजपच्या 12 आमदारांचं निलंबन केलं होतं. तसंच भाजपच्या अभिरुप विधानसभेतील माईक काढून घेण्याचा निर्णय घेतला होता. 


शिवसेनेच्या कोट्यातील वनमंत्री पद देऊन अध्यक्ष पद घेऊ नये असा सल्लाही भास्कर जाधव यानी दिला. शिवसेनेकडे वनखातं राहून जर अधिकचं विधानसभा अध्यक्षपद मिळत असेल तर ते स्वीकारावं असंही ते म्हणाले. 
         
मराठी नेत्यांना संपवण्याचा भाजपचा डाव
राज्यातील भाजपचे नेते केंद्र सरकारच्या सुरक्षा यंत्रणेचा वापर करुन महाराष्ट्रातील मराठी नेते आणि उद्योगपतींना संपवण्याचे काम करत आहेत. तो त्रास मलाही होणार हे मला माहित आहे पण मी ईडीला भीक घालत नाही. भाजपकडून जर त्रास झालाच तर मदत मागण्यासाठी मी कोणाच्या दारातही जाणार नाही असं आमदार भास्कर जाधव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 


शिवसेना नेते भास्कर जाधव म्हणाले की, "तालिका अध्यक्षपद घेतल्यानंतर या पदाचे अधिकार, सदस्यांचा मान-सन्मान राखणे, महत्त्वाचे विषय हाताळताना नियम व शिस्त याला प्राधान्य देण्याचे मी ठरवले होते आणि यातून दिर्घकाळ आपली कामगिरी लोकांच्या लक्षात राहिली पाहिजे असा विचार केला होता. मी विरोधी पक्षाला पुरेपूर संधी दिली होती. मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण आणि इतर विधेयक मंजूर करताना विरोधी पक्षाला चर्चेत सहभागी होण्याची सूचना केली होती. विरोधी पक्षाने सभागृहातील चर्चेत भाग घेतला नाही."


भास्कर जाधव पुढे म्हणाले की, "विधानभवनाच्या पायऱ्यांवर अभिरुप विधानसभा भरवली तेथे स्पीकर लावून भाषणे झाली. भाजपचे साठ आमदार विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घुसले, तालिका अध्यक्षांना धक्काबुक्की केली. या साऱ्या प्रकारचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी सभापती हरीभाऊ बागडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या ज्येष्ठ नेत्यांनी केले. मी पाच वेळा विधानसभेत निवडून गेलो आहे.अधिवेशनात चुकीच्या प्रथा पडता कामा नये. नव्याने येणाऱ्या सदस्यांना विधानसभेचे कामकाज समजले पाहिजे यासाठी मी आक्रमक भूमिका घेतली."


म्हणून 12 आमदारांचे निलंबन केलं...
राज्य सरकारने विधान परिषदेतील नियुक्तीसाठी 12 आमदारांची यादी राज्यपालांकडे पाठवली आहे. त्याला राज्यपाल मंजुरी देत नाही म्हणून भाजपचे 12 आमदार निलंबित करुन भाजपवर दबाव टाकण्याचा प्रयत्न आघाडी सरकारने केला आहे का असं विचारलं असता आमदार जाधव म्हणाले, 12 आमदारांनी धक्काबुक्की केली म्हणून 12 आमदारांचे निलंबन केले. जर 18 आमदार धक्काबुक्की करताना आढळले असते तर 18 आमदारांचे निलंबन केले असते. 


सभेत अनेकवेळा मान-अपमानावरून गोंधळ घातला जातो
पूर्वीचा काळ वेगळा होता असं सांगत भास्कर जाधव म्हणाले की, "विधान परिषदेत शिवसेनेचे प्रमोद नवलकर एका विषयावर चर्चा करायला उभे राहिले. तेव्हाचे सांस्कृतिक मंत्री विलासराव देशमुखांनी नवलकर यांच्या प्रश्नांची उत्तर दिले. नवलकर प्रश्न विचारायचे आणि देशमुख त्यावर उत्तर द्याचे. कोणत्याही वादाविना दिर्घकाळ ही चर्चा रंगली. अखेर जयंतराव टिळकांनी मध्यस्ती करून सामना बरोबरीत सुटला असे सांगत ही चर्चा संपुष्टात आणली. आपल्या सभागृहाचा चांगला संदेश देशात गेला पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे"


नारायण राणे यांना यापूर्वी महाराष्ट्र सरकारने सुद्धा उद्योग खातं दिल होत. महाराष्ट्रात उद्योग मंत्री असतांना त्यांनी कोकणाकरीता किती उद्योग आणले. याचा आपण विचार करावा. आपल्या मंत्रीपदाचा उपयोग त्यांनी देशाबरोबर कोकणाला अधिकचा होईल याचा त्यांनी विचार करावा असाही सल्ला शिवसेना नेते भास्कर जाधव यांनी दिला आहे. 


महत्वाच्या बातम्या :