मुंबई : उशिरानं का होईना पण हळूहळू पूर्णत्वास येणा-या मुंबई - गोवा महामार्गावर टोलवसुली काम पूर्ण झाल्यावर सुरू करणार की, टप्याटप्यात सुरू करणार?, यावर भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश हायकोर्टानं राज्य सरकारला दिले आहेत. गेली अनेक वर्ष या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपरदीकरणाचं काम रखडलेलं आहे. मुंबई - गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे गेल्या 10 वर्षात इथं अपघातांमुळे 2442 लोकांचा जीव गेल्याची माहिती शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयात देण्यात आली. 


सुमारे 62 टक्के काम पूर्ण झालं आहे. इंदापूर ते झाराप (सिंधुदुर्ग) दरम्याचे 355 कि.मी.पैकी 206 कि.मी.चे काम पूर्ण असून बाकीचं काम पूर्ण करण्यासाठी आणखीन किमान 200 कोटींचा निधी आवश्यक असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी हायकोर्टापुढे मांडली. त्यावर संबधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुढील सुनावणीत ही सादर करू, असं राज्य सरकारच्यावतीने महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी हायकोर्टाला सांगितलं. त्याची दखल घेत हायकोर्टानं सुनावणी ऑगस्ट महिन्यापर्यंत तहकूब केली आहे.


मात्र या मार्गावर सध्या वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाने प्रतिाापत्राद्वारे न्यायालयात सादर केली आहे. वास्ववात मात्र मुंबई-गोवा महामार्गाचे काम अत्यंत धिम्यागतीने सुरू असून मॉन्सूनमुळे इथं पुन्हा एकदा खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाली असून वाहनचालकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे चौपदरीकरणाचे हे काम वेगात करण्यात यावे अशी मागणी करणारी जनहित याचिका चिपळूणचे रहिवासी अ‍ॅड.ओवेस पेचकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात  दाखल केली आहे. याची दखल घेऊन हायकोर्टानम मागील सुनावणीत राज्य सरकारला महामार्गाच्या कामाची वस्तुस्थिती, काम पूर्णत्वास नेण्याचा कालावधी आणि कंत्राटदारांच्या नावांची यादीसह प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे एक्झिक्युटीव्ह इंजिनिअर श्रीकांत बांगर यांनी हे प्रतिज्ञापत्र कोर्टात सादर केले आहे. या प्रतिज्ञापत्रात सध्या केवळ 62 टक्के काम पूर्ण झाल्याची कबूली देण्यात आली आहे.तसेच काम पूर्ण न करणार्‍या दिलीप बिल्डकॉन, केसीसी बिल्डकॉन, के टी इन्फ्रा, चेतक इंटरप्राईसेस, एमईपी सांजोस या कंत्राटदारांच्या नावाची यादी देत, डिसेंबर 2022 पर्यंत हे काम पूर्ण होण्याची हमी दिली आहे. 




शुक्रवारच्या सुनावणीत चिपळूण शहरानजीक असणा-या वशिष्ठी नदीवरील नवीन पुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार असून या पुलावरील सध्या केवळ दोन लेन वाहनचालकांसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याची माहिती या प्रतिज्ञापत्रातून देण्यात आली. मात्र य पुलासह संपूर्ण महामार्गासाठी पीडब्ल्यूडी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सुरक्षिततेच्या बाबतीत आवश्यक उपाययोजना तातडीनं राबविणं गरजेचं आहे. कारण, महामार्गाची स्थिती खूप बिकट आहे. त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे. पावसाळाही सुरू झाला असून खडड्यांमुळे वाहनांचे अपघातही होऊ शकतात. इथं अनेक ठिकाणी मार्ग दाखविण्यासाठी दिशादर्शक फलक नाहीत, रस्त्यावर दिव्यांची सोय नाही. त्यामुळे वाहनचालकांच्या सतर्कतेसाठी बॅरिकेड्स अथवा तात्पुरते दिशादर्शक लावण्यात यावेत, जेणेकरून आपण अपघात आणि काही जीव वाचवू शकू, असे तोंडी निर्देश हायकोर्टानं पीडब्ल्यूडी आणि महामार्ग प्राधिकरणाला वारंवार दिले आहेत.