Shivraj Patil Chakurkar : शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन, राजकारणातील स्वच्छ प्रतिमेचा अंतिम प्रवास
भारतीय राजकारणातील सौम्य, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले.
Shivraj Patil Chakurkar passes away : भारतीय राजकारणातील सौम्य, अभ्यासू आणि संसदीय परंपरा जपणारे नेता म्हणून ओळखले जाणारे माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे निधन झाले. मराठवाड्यातील चाकूर गावातून सुरू झालेला त्यांचा सामाजिक, राजकीय प्रवास दिल्लीपर्यंत पोहोचला आणि पाच दशकांहून अधिक काळ त्यांनी राष्ट्रीय राजकारणात महत्त्वपूर्ण स्थान मिळवले. जाणून घेऊयात त्यांची राजकीय कारकीर्द कशी होती? मंत्रीपदापर्यंतचा प्रवास कसा होता? याबाबतची माहिती.
राजकीय कारकीर्द : सातत्य, सौम्यता आणि संघटनकौशल्य
12 ऑक्टोबर 1935 रोजी लातूर जिल्ह्यातील चाकूर येथे जन्मलेले शिवराज पाटील यांनी 1960 नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांमधून सार्वजनिक जीवनाची सुरुवात केली. आधी विधानसभा आणि नंतर 1980 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेत निवडून आले आणि सलग सात वेळा लातूरचे प्रतिनिधित्व करत राष्ट्रीय पातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली.
मंत्रिपदांचा प्रवास :
इंदिरा गांधी यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण राज्यमंत्री म्हणून सुरुवात
वाणिज्य, विज्ञान-तंत्रज्ञान, अणुऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स, अवकाश, महासागर विकास अशा महत्त्वाच्या खात्यांचा कार्यभार
राजीव गांधी सरकारमध्ये कार्मिक आणि संरक्षण उत्पादन मंत्री
नागरी विमान वाहतूक आणि पर्यटन विभागाचा स्वतंत्र कार्यभार
पाटील यांची संयमी वृत्ती, संसदीय नियमांची जाण आणि शिस्तप्रियता यामुळे ते इंदिराजी व काँग्रेस पक्षातील विश्वासू चेहरा मानले जात.
लोकसभा अध्यक्ष म्हणून अधोरेखित कामगिरी (1991–1996)
लोकसभा कामकाजाचे आधुनिकीकरण
प्रश्नोत्तराच्या तासाचे थेट प्रक्षेपण सुरु
संसद ग्रंथालयाचे नव्या इमारतीत स्थलांतर
माहिती प्रसारण आणि सदस्यांसाठी संसदीय साहित्य उपलब्धतेत सुधारणा
त्यांच्या काळात लोकसभेचे कामकाज अधिक पारदर्शक आणि जनसुलभ करण्यासाठी ते ओळखले गेले.
गृहमंत्री पदावरील कार्यकाळ (2004–2008)
2004 मध्ये निवडणूक पराभूत होऊनही त्यांच्यावर पक्षाने ठेवलेल्या विश्वासामुळे त्यांना केंद्रीय गृहमंत्रिपद देण्यात आले. हे त्यांच्या राजकीय वजनाचे प्रतीक मानले गेले. गांधी घराण्याची असलेली त्यांची निष्ठा कायमच चर्चेचा विषय ठरली.
वादाचे विषय : झालेल्या टीका आणि कठीण निर्णय
मुंबई 26/11 हल्ल्यांनंतरचा राजीनामा
2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांनंतर सुरक्षेतील त्रुटींवर देशभर टीका झाली. या हल्ल्यांची नैतिक जबाबदारी स्वीकारत शिवराज पाटील चाकूरकर यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जातो.
नंदीग्राम प्रकरणातील टीका :
पश्चिम बंगाल सरकारच्या विनंतीनंतरही नंदीग्राममध्ये केंद्रीय दल वेळेवर न पाठवल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. त्यानंतर झालेल्या हिंसाचारामुळे या निर्णयावर मोठा वाद निर्माण झाला.
मालेगाव बॉम्बस्फोट (2006) :
मालेगाव स्फोटांमध्ये गोंधळलेले तपास, विविध एजन्सींमधील मतभेद यामुळे गृहमंत्रालयाच्या निर्णयक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले.
अमेरिकेच्या राजनैतिक केबलमधील टीका :
अमेरिकेचे राजदूत डेव्हिड मुलफोर्ड यांनी 26/11 नंतर पाटील यांना “अयोग्य” ठरवत हकालपट्टी अपरिहार्य असल्याचे लिहिल्याचा खुलासा 'विकिलीक्स'मधून झाला. यामुळे त्यांच्या प्रतिमेवर आणखी वादाचा रंग चढला.
उत्तरार्धातील राजकीय जीवन :
2008 नंतर काही काळ शांततेत राहिल्यानंतर 2010 मध्ये त्यांची पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक म्हणून नियुक्ती झाली. काही काळ त्यांनी राजस्थानाचे प्रभारी राज्यपाल म्हणूनही कारभार पाहिला. पंजाबचे राज्यपाल आणि चंदीगड प्रशासक म्हणून 2015 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी अतिशय सन्मानाने पार पाडली. भाजपाची सत्ता असतानाही त्यांना राज्यपाल पदावर कायम ठेवण्यात आलं होतं.
शिस्तप्रिय नेता, सौम्य व्यक्तिमत्त्व :
शिवराज पाटील हे शांत, संयमी आणि संसदीय परंपरांचे काटेकोर पालन करणारे म्हणून नेहमी लक्षात राहतील. सत्य साईबाबा यांचे ते निष्ठावंत अनुयायी होते. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि शांत शैली हे त्यांच्या नेतृत्वाचे वैशिष्ट्य होते. गीतेचे त्यांनी इंग्रजी मध्ये भाषांतर केले होते.
शिवराज पाटील यांचे निधन म्हणजे मराठवाड्यातील आणि राष्ट्रीय राजकारणातील एका संपूर्ण युगाचा अंत. प्रशासन, संसद, मंत्रालय आणि राज्यपालपद या सर्व पातळ्यांवर त्यांनी दिलेली सेवा दीर्घकाळ स्मरणात राहील. शिवराज पाटील चाकूरकर यांची राजकीय कारकीर्द अनेक उतार-चढावांनी भरलेली असली, तरी सार्वजनिक जीवनातील त्यांचा मोठा वाटा आणि दिलेला दीर्घकालीन योगदान नेहमी आदराने स्मरणात राहील.
राज्यकारभारातील एक सुसंस्कृत पर्व संपले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील राजयोगी म्हणून ओळखले जाणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचे आज निधन झाले. लातूरचे नगराध्यक्ष ते केंद्रीय गृहमंत्री असा त्यांचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय राहिला आहे. अशा भावना मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केल्या. स्वच्छ चारित्र्य, अजातशत्रू वृत्ती, विविध पक्षांतील नेत्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि विचारांचा सन्मान ही त्यांच्या नेतृत्वाची वैशिष्ट्ये होती. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांवरील प्रभुत्वामुळे ते उत्तम वक्ते म्हणूनही ओळखले जात. अध्यक्षस्थानावर असताना त्यांनी दाखवलेले कामकाज हे एक आदर्श मापदंड मानले जाते. वैयक्तिक पातळीवरही अनेकांना त्यांनी मार्गदर्शन केले. चांगल्या कामाचे कौतुक आणि विविध विषयांवरील सखोल ज्ञानामुळे त्यांच्याशी चर्चा ही एक पर्वणीच ठरायची. जलयुक्त शिवारसारख्या योजनांवरही त्यांनी गंभीरपणे चर्चा करून मार्गदर्शन केले होते. अर्चना पाटील भाजपात दाखल झाल्यानंतरही “मी जिथे आहे तिथेच राहणार” अशी स्पष्ट भूमिका त्यांनी घेतली होती. त्यांच्या मोठेपणाची ती जिवंत साक्ष होती असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मनातही पाटील साहेबांविषयी प्रचंड आदर असल्याचे सांगितले जाते. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर येथील देवघर येथे पाटील साहेबांचे अंत्यदर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासोबत लातूर भाजपाचे जिल्हाध्यक्ष बसवराज पाटील मुरुमकर आणि आमदार संभाजी पाटील निलंगेकर उपस्थित होते.
पाटील साहेबांच्या जाण्याने राज्याचे आणि देशाचे एक सुसंस्कृत, संयमी आणि विचारशील नेतृत्व हरपल्याची भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. त्यांच्या कार्यातून आणि व्यक्तिमत्त्वातून प्रेरणा घेण्यासारखे खूप काही आहे. असे मत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.
महत्वाच्या बातम्या:























