सिंधुदुर्ग : छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली. राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्राच्या 13 कोटी जनतेची माफी मागितली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर दौऱ्यासाठी आले असता त्यांनीही सिंधुदुर्घमधील घटनेबद्दल महाराष्ट्राची व शिवभक्तांची माफी मागितली होती. मात्र, महाविकास आघाडीकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवर राज्यभर आंदोलन करण्यात आले. त्यामुळे, शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याचे राजकारण होत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून केला जात आहे. त्यातच, आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य फार्मिंग कार्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालक पदी त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे. तर, हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 


किशोर तावडे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी (Collector) पदाचा कार्यभार स्वीकारला होता. त्यांच्या कालावधीत भारतीय नौसेना दिन मालवण मध्ये साजरा करण्यात आला होता. तसेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ही बांधण्यात आला होता. मात्र छत्रपतींचा हा पुतळा (Shivaji Maharaj)अगदी पावणे नऊ महिन्यातच कोसळला होता. त्याचा वादंग अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात सुरू आहे. या दुर्घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी चांगलेच कोंडीत पकडले आहे. तसेच त्याअगोदर देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनीही थेट मीडिया समक्षच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रशासकीय कारभारावर तावडे यांच्या उपस्थितीमध्येच उघड नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांची झालेली तडका फडकी बदली हा चर्चेचा विषय बनला आहे.


सामान्य प्रशासन विभागाच्या अपर सचिव व्ही. राधा यांच्यासहीने त्यांना बदलीचे पत्र पाठवण्यात आले आहे. त्यामुळे, अचानक तडकाफडकी बदली झाल्यामुळे ही बदली करण्याचे नेमके कारण काय, असा प्रश्न प्रशासकीय वर्तुळात विचारला जात आहे. किशोर तावडे यांनी 23 ऑगस्ट 2023 रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता. सिंधुदुर्गचे  जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची झालेली तडका फडकी बदली नेमकी कशासाठी हे कारण सध्या गुलदस्त्यात आहे. दरम्यान, शासनाने आपली बदली केली असून, आपली नियुक्ती, व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ, पुणे या रिक्त पदावर केली आहे. आपल्या जागी  अनिल पाटील, भाप्रसे यांची नियुक्ती केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार  पाटील, भाप्रसे यांच्याकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार त्वरीत स्वीकारावा, असे पत्र किशोर तावडे यांना पाठवण्यात आले आहे. 


अनिल पाटील नवे जिल्हाधिकारी


सामान्य प्रशासन विभागाकडे अनिल पाटील यांनाही पत्राद्वारे जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासनाने आपली नियुक्ती जिल्हाधिकारी सिंधुदूर्ग या पदावर किशोर तावडे, भाप्रसे यांच्या जागी ते पद कनिष्ठ प्रशासकीय श्रेणीत अवनत करून केली आहे. तरी आपण आपल्या सध्याच्या पदाचा कार्यभार प्रधान सचिव, वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्याकडे आणि आपल्याकडे अतिरिक्त कार्यभार म्हणून असलेल्या व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई या पदाचा कार्यभार अपर मुख्य सचिव व विकास आयुक्त, नियोजन विभाग यांच्या सल्ल्याने अन्य अधिकाऱ्यांकडे सोपवून, नवीन पदाचा कार्यभार तावडे, भाप्रसे यांच्याकडून त्वरीत स्वीकारावा, असे अनिल पाटील यांना पाठवण्यात आलेल्या बदलीच्या पत्रात म्हटले आहे. 


हेही वाचा


भाजपचे आजी-माजी आमदार आमने-सामने ; लाडक्या बहि‍णींना कुणी साड्या वाटल्या, कुणी सायकली