मुंबई : उद्धव ठाकरे कोण आहे? त्याची लायकी आहे का पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोलण्याची? अशा शब्दात भाजपचे खासदार नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. शरद पवारांचे वय 83 झाले तरी त्यांना स्वतःच्या जातीला न्याय देता आला नाही, ते आता लावालाव्या करत फिरत आहेत असंही ते म्हणाले. रविवारी महाविकास आघाडीने राज्य सरकारविरोधाच जोडे मारो आंदोलन केलं. त्याला नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून उत्तर दिलं. 


नारायण राणे म्हमाले की, शिवाजी महाराजांचा जो पुतळा पडला तो माझ्या मतदारसंघात आहे म्हणून मी आज पत्रकार परिषद घेऊ आहे. तो पुतळा पडला हे दुर्दैवी. पण सामनामध्ये ज्या प्रकारची भाषा वापरण्यात आली तशी वापरू नये. मुख्यमंत्र्यांना गेट आऊट म्हणणारे उद्धव ठाकरे कोण आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना असे बोलतो, कोण आहेस तू? 


उद्धवची लायकी आहे का मोदीं बोलायची


उद्धव ठाकरेंवर टीका करताना नारायण राणे म्हणाले की, यांनी महाराष्ट्राची माफी मागितली नसती तर महाराष्ट्राने यांना संपवलं असतं असं उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना उद्देशून बोललं होतं. उद्धव तुझी लायकी नाही मोदींना बोलायची. तुझ्यासारखा भ्रष्ट माणूस मी बघितला नाही. एकदा एक काम करण्यासाठी याने बिल्डरकडून 3 लाख रुपये घेतले होते. आमच्या रवी शेंडगेकडून मिलिंद नार्वेकरने 3 लाख घेतले होते. आदित्य ठाकरेने 15 टक्के कमिशन घेतले. त्यामुळे यांनी भ्रष्टाचारावर बोलू नये. तू कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाही. प्रशासन नाही, कायदा माहीत नाही, काय होणार मुखमंत्री? 


शरद पवारांनी स्वतःच्या जातीला न्याय दिला नाही


नारायण राणे म्हणाले की, आजही शरद पवार जाती-जातीमध्ये लावलावी करत आहेत. शरद पवार प्रत्येक गोष्टीत राजकारण करत आहेत. 83 वय झालं तरी स्वतःच्या जातीला न्याय देऊ शकले नाही. त्यांची प्रत्येक गोष्ट संशयास्पद आहे. पवारांनी शांततेचा संदेश दिला पाहिजे, पण ते काडी आणि पेट्रोल घेऊन फिरतात. पवार सत्तेत येणार म्हणतात, पण अजित पवार त्यांना सत्तेत येऊ देणार का? 


पुतळा पडल्यानंतर त्यावर राजकारण न करता सर्वांनी एकत्र येऊन तो पुन्हा उभारण्यासाठी प्रयत्न करायला हवे होते. पण शरद पवार आणि उद्धव ठाकरे यावर राजकारण करत आहेत असा आरोप नारायण राणे यांनी केला.  


माझेही एक इंटेलिजन्स डिपार्टमेंट


माझे पण इंटेलिजन्स डिपार्टमेंट आहेत असं म्हणत नारायण राणे म्हणाले की, मला पण एक फोन आला, शिव्या वगैरे घातल्या. मी त्याचा नंबर आणि पत्ता काढला. तर तो शरद पवार यांचा कार्यकर्ता निघाला. मला पता मिळाला की त्याला संरक्षण घ्यावे लागेल ना? शरद पवार भडकवण्याचं राजकारण करत आहेत. 


महाविकास आघाडीवाले म्हणतात की तेच सत्तेत येणार. मग आम्ही काय सत्ता द्यायला बसलो आहोत का? असा प्रश्न विचारत नारायण राणे म्हणाले की, उद्धव ठाकरे अडीच वर्षांच्या काळात दोन दिवस मंत्रालयात गेला. त्याला फायनान्स कळत नाही, मग झक मारायला मुख्यमंत्री बनला होता का? हा बावळट माणूस मुख्यमंत्री व्हावा असे तुम्हाला वाटते का? शिवसेनेत आता काय रस राहिला नाही, 40 आमदार सोडून गेले.


जयंत पाटलांनी तीनवेळा विनंती केली


राजकोट किल्यावरील घटनेसंबंधी बोलताना नारायण राणे म्हणाले की, राजकोटवर मी गेलो तेव्हा विजय वडेट्टीवार होते, त्याने येऊन हात वगैरे मिळवला. त्यानंतर हे कोण आले घोषणा देत? मी पोलिसांना सांगितले, हा आता आलाय मी त्याला जाऊ देणार नाही. मग जयंत पाटील आले सांगायला, दादा जाऊ दे. तिसऱ्यांदा जयंत पाटील आले आणि म्हणाले, दादा जाऊ दे. मी सांगितले इथून मान खाली घालून जायचे, वर करायची नाही. तेव्हा जाऊ देतो.