Shiv Sena Saamana Editorial On UPA Renovation : एकीकडे राज्यात पारा वाढत असताना, दुसरीकडे राजकीय गरमागरमीही जोरदार आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांना यूपीएचं (UPA) अध्यक्षपद द्यावं, असा ठराव राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं मंजूर केल्यानंतर शिवसेनेनंही यूपीएच्या जीर्णोद्धाराची गरज व्यक्त केली आहे. शिवसेनेचं मुखपत्र सामनातून आज यावर भाष्य करण्यात आलं आहे. यूपीएचा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर असून त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणं शक्य दिसत नाही, असं स्पष्ट मत सामनातून व्यक्त करण्यात आलं आहे. 


काही दिवसांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशात सेक्युलरवादाचं अजीर्ण झाल्यानं भाजपचा विजय झाला असल्याची परखड टीकाही सामनातून करण्यात आली आहे. बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे याचं भान विरोधकांच्या नव्या आघाडीनं ठेवलं तरच यूपीएचा जीर्णोद्धार शक्य आहे, असं सांगत नव्या आघाडीला हिंदूत्वाचा विचार करण्याचा सल्लाही सामनातून शिवसेनेनं दिला आहे.  


"शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी 'पुरोगामी' शक्तींना साद घातली आहे.", असंही सामना अग्रलेखात म्हटलं आहे. "पंजाब वगळता चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकूनही मोदी पक्ष समाधानी दिसत नाही. केंद्रात अमर्याद सत्ता असली तरी बिगर भाजपशासित राज्यांना काम करू द्यायचे नाही असा त्यांचा अजेंडा आहे.", असं म्हणत भाजपला सामनातून टोलाही लगावला आहे. 


काय म्हटलंय सामना अग्रलेखात? 


विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी 'यूपीए'चा जीर्णोद्धार करणे. 'यूपीए'चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही.


शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी 'पुरोगामी' शक्तींना साद घातली आहे. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला तो समोर सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे. देश सगळय़ांचा आहे, पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व 'यूपीए'चा जीर्णोद्धार शक्य आहे.


पंजाब वगळता चार राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकूनही मोदी पक्ष समाधानी दिसत नाही. केंद्रात अमर्याद सत्ता असली तरी बिगर भाजपशासित राज्यांना काम करू द्यायचे नाही असा त्यांचा अजेंडा आहे. अशा राज्यांत रोजच अडथळा व अडचणी निर्माण करून लोकशाहीची पायमल्ली सुरू आहे. या मनमानीविरुद्ध बिगर भाजप पक्षांना एकजुटीचे आवाहन ममता बॅनर्जी यांनी केले आहे. ममता बॅनर्जी यांनी अशा सर्व मुख्यमंत्र्यांना आणि पक्षांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. सर्व 'पुरोगामी' शक्तींनी एकत्र येऊन भाजपच्या मनमानी, एकाधिकारशाहीशी लढा द्यावा, असे ममतांनी काँग्रेससह अन्य पक्षांच्या प्रमुखांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. ममतांनी हे पत्र काँग्रेसच्या प्रमुखांनाही लिहिले आहे. म्हणजे काँग्रेसशिवाय विरोधकांची एकजूट शक्य नाही हे त्यांनी मान्य केले. काँग्रेस हा विरोधी पक्ष म्हणून टिकलाच पाहिजे. काँग्रेस संपता कामा नये, असे मत नितीन गडकरींसारख्या भाजपच्या नेत्याने, केंद्रीय मंत्र्याने मांडले. याचा अर्थ असा की, दिल्लीत सध्या जी राजकीय व्यवस्था आहे, त्यांना विरोधी पक्षाचे अस्तित्वच नष्ट करायचे आहे. अशी तयारी काही मंडळींनी सुरूही केली आहे. उत्तर प्रदेशात भाजप जिंकला हे ठीक; पण हाथरस, उन्नाव, लखीमपूर खिरी येथील भयंकर घटना-घडामोडींनंतरही तेथे भाजपचा विजय होऊ शकतो याबाबत लोकांच्या मनात शंका आहेत. येथील बलात्कार, महिला अत्याचाराविरोधात लोकांच्या मनात रोष होता तरीही त्या ठिकाणी भाजपचे उमेदवार विजयी झाले. हे आक्रित आहे. काही केले तरी आम्हीच निवडणुका जिंकून दाखवतो हे तंत्र ज्या राज्यव्यवस्थेपाशी आहे, त्यांच्या विरोधात लढणे कठीण असले तरी अशक्य नाही. एखाद्या राज्यात भाजप विरोधकांनी निवडणुका जिंकल्या की पंतप्रधान, गृहमंत्री त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करतात. केंद्राकडून राज्यास पूर्ण मदत मिळेल असे आश्वासन देतात, पण ते अभिनंदनाचे शब्द हवेत विरण्याआधीच त्या राज्यांच्या विरोधात कारस्थाने सुरू होतात. हे कोत्या मनाचे हलके राजकारण आहे. पंजाबात 'आप'ने निवडणुका जिंकल्या. भगवंत मान मुख्यमंत्री झाले. त्यांनी जनहिताचे काही निर्णय धडाक्यात घ्यायला सुरुवात करताच केंद्राने राजधानी चंदिगढमध्ये त्या राज्याच्या विरोधात अधिकाऱयांना फितवायला सुरुवात केली. पंजाबातील सरकार लोकशाही मार्गाने, प्रचंड बहुमताच्या आधारावर सत्तेवर बसले आहे. जसे बहुमत उत्तर प्रदेशात व अन्य राज्यांत भाजपला मिळाले तसेच ते पंजाबात 'आप'ला मिळाले. 'आप' आता हिमाचल, हरयाणात कामास लागला आहे. त्यामुळे घाबरून केंद्राने त्यांच्या नाडय़ा आवळायला सुरुवात केली आहे. म्हणूनच ममता बॅनर्जी यांच्या एकजुटीच्या आवाहनास अरविंद केजरीवाल प्रतिसाद देणार आहेत काय? 


प. बंगालातील विधानसभेत भाजप व तृणमूलमध्ये दंगल झाली. वीरभूमीतील हिंसा निषेधार्ह आहे, पण त्या हिंसेवर पाणी टाकण्याऐवजी तेल ओतण्याचे काम तेथील भाजपवाले करीत आहेत. वीरभूमी हिंसेच्या निमित्ताने ममतांचे सरकार बरखास्त करण्यासाठी जर भाजपचे हे अघोरी प्रयोग असतील तर ते योग्य नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून भाजप येथील महाविकास आघाडी सरकार उलथवू पाहत आहे. तेलंगणा, तामीळनाडू, केरळातही विरोधकांची सरकारे अस्थिर करण्याचे डावपेच सुरूच आहेत. शिवाय ज्या भाजपशासित राज्यांतला विरोधी पक्ष सक्रिय व लोकाभिमुख आहे, तेथे विरोधकांवर दाबदबावाचे प्रयोग चालले आहेत. झारखंड, छत्तीसगढ भाजपच्या टार्गेटवर आहेत. ज्या राज्याचे मुख्यमंत्री 'द कश्मीर फाईल्स' चित्रपटास करमुक्त करणार नाहीत ते सर्व देशाचे दुश्मन असे या मंडळींनी ठरवून टाकले आहे! अशा मानसिकतेतून देशाला बाहेर काढणारे नेतृत्व विरोधी पक्षांत आहे काय? असेल तर त्यावर एकमताची मोहोर उठेल काय? ते घडणार असेल तरच ममता बॅनर्जी यांनी सुरू केलेल्या एकजुटीच्या प्रयत्नास काही अर्थ आहे. भाजपप्रणीत 'एनडीए' उरलेले नाही, पण काँग्रेसप्रणीत 'यूपीए' तरी आज कोठे दिसत आहे काय? यूपीएत नक्की कोण आहे व त्यांचे काय चालले आहे याबाबत शंका आहे. विरोधकांनी एकजुटीसाठी पाऊल पुढे टाकणे म्हणजे सर्वात आधी 'यूपीए'चा जीर्णोद्धार करणे. 'यूपीए'चा सातबारा सध्या काँग्रेसच्या नावावर आहे. त्यात बदल केल्याशिवाय विरोधकांची भक्कम एकजूट होणे शक्य दिसत नाही. पाच राज्यांतील पराभवानंतर काँग्रेस पुढाकार घेऊन निदान 'यूपीए'च्या जीर्णोद्धारासाठी विरोधकांना साद घालेल या अपेक्षेत सगळे होते. काँग्रेस पक्षाचे स्वतःचे काही अंतर्गत, कौटुंबिक प्रश्न असू शकतात, पण हे प्रश्न विरोधकांच्या एकजुटीतील अडथळे ठरू नयेत. शरद पवार, उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, केजरीवाल, के.सी. राव, एम. के. स्टॅलिन हे सर्व तालेवार लोक आहेत व नव्या एकजुटीसंदर्भात त्यांच्याशी चर्चा होणे आवश्यक आहे. यासाठी काँग्रेसने पुढाकार घेतला नाही म्हणून ममता बॅनर्जी यांना पुढे यावे लागले. त्यांनी 'पुरोगामी' शक्तींना साद घातली आहे. पुरोगामी म्हणजे फालतू सेक्युलरवाद नाही. उत्तर प्रदेशात भाजपचा विजय झाला तो समोरच्यांना सेक्युलरवादाचे अजीर्ण झाल्यामुळे. देश सगळय़ांचा आहे, पण बहुसंख्य हिंदू समाज देशाचा मुकुटमणी आहे. हिंदुत्व आणि हिंदू समाजाइतका सहिष्णू आणि पुरोगामी समाज जगाच्या पाठीवर दुसरा नाही. विरोधकांच्या नव्या आघाडीने या विचाराचे भान ठेवले तरच भाजपविरोधी आघाडीस बळ मिळेल व 'यूपीए'चा जीर्णोद्धार शक्य आहे. नाहीतर 'येरे माझ्या मागल्या'चा पुढचा अंक सुरूच राहील!


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha