Ashtavinayak Helicopter Service : आता गणेशभक्तांना एकाच वेळी हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शन मिळणार आहे. हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक सेवा आजपासून प्रायोगिक तत्त्वावर सुरु झाली आहे. काल बुधवारी पाच गणेश भक्तांना घेऊन ओझरपासून ही सेवा सुरु झाली. ही सेवा लवकरच कायमस्वरूपी केली जाणार असल्याची माहिती ओझरचे माजी मुख्य विश्वस्त बबन मांडे यांनी दिली. काल बुधवारी, ओझर येथे आरती करुन या सेवेस शुभारंभ झाला. ओझरनंतर रांजणगाव, सिद्धटेक, मोरगाव, थेऊर, पाली, महड, लेण्याद्री असे मार्गक्रमण होणार आहे. अष्टविनायकाचे हेलिकॉप्टरच्या माध्यमातून दर्शन हा उपक्रम ओझर येथील विघ्नहर देवस्थानपासून सुरु करण्यात आला. या सेवेमुळं भाविकांना एकाच वेळी अष्टविनायकांचे दर्शन घेता येणार आहे. कमीत कमी वेळात हे दर्शन होणार असल्यानं भाविकांना याचा फायदा होणार आहे.
महाराष्ट्रातील नव्हे संपूर्ण भारतातून जगभरातून गणेशभक्तांना एकदातरी अष्टविनायक गणपतीचे दर्शन व्हावे, अशी मनोकामना असते. प्रवासाची सर्व साधने उपलब्ध असून देखील वेळेअभावी अष्टविनायक दर्शनाचा लाभ काही भाविक घेऊ शकत नाही. ही भाविकांची मागणी लक्षात घेऊन ट्रस्टने भाविकांसाठी व जगभरातून येणाऱ्या पर्यटकांसाठी कमीत कमी वेळेमध्ये अष्टविनायक दर्शन (परिक्रमा) पूर्ण होण्यासाठी हेलिकॉप्टरद्वारे दर्शन हा संकल्प प्रथम श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टने सर्व अष्टविनायक देवस्थानच्या पदाधिकारी यांच्या बैठकीत मांडली होती. यानंतर हेलिकॉप्टर द्वारे भाविकांना दर्शनाची सुविधा देण्याचा निर्णय घेण्यात आला. हेलिकॉप्टरसाठी प्रत्येक गणपतीच्या ठिकाणी हेलिपॅडची निर्मिती करण्यात आली आहे.
अन् गेल्या अनेक दिवसापासून चर्चेत असलेली अष्टविनायक दर्शनाची हवाई सफरीची प्रतीक्षा संपली. विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या पुढाकाराने आणि सर्व अष्टविनायक देवस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या संकल्पनेतून बुधवारी हेलिकॉप्टरद्वारे अष्टविनायक दर्शनाचा प्रारंभ झाला.
या हेलिकॉप्टरद्वारे दर्शनाचा पहिला मान विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष बी. व्ही. मांडे, माजी अध्यक्ष वसंतराव पोखरकर, उद्योजक मीराताई पोखरकर, सर्पदंश तज्ञ डॉ. सदानंद राऊत, डॉ. पल्लवी राऊत यांना मिळाला.ही सेवा सुरु करताना महागणपती देवस्थान ट्रस्ट रांजणगावचे विजयराज दरेकर, वरदविनायक देवस्थान ट्रस्टच्या मोहिनीताई वैद्य, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट पालीचे धनंजय धारप, चिंतामणी देवस्थान ट्रस्टचे विनोद पवार, सिद्धिविनायक सिद्धटेक देवस्थान ट्रस्टचे मंदार देव, मयुरेश्वर देवस्थान ट्रस्ट मोरगावचे आनंद देव, गिरिजात्मक देवस्थान ट्रस्ट लेण्याद्रीचे सदाशिव ताम्हाणे व जितेंद्र बिडवई उपस्थित होते.