(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ulhasnagar : राष्ट्रवादीची ताकद वाढल्यानं शिवसेनेची हातमिळवणी! कलानी परिवाराच्या हाती उल्हासनगरचा रिमोट कंट्रोल
उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगर शहरातली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत.
Ulhasnagar Municipal Corporation Election : उल्हासनगर महापालिकेची आगामी निवडणूक एकत्र लढण्याचा निर्णय शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं घेतला आहे. कलानी परिवाराच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर उल्हासनगरात राष्ट्रवादीची ताकद वाढली आहे. त्यामुळेच शिवसेनेनं निवडणुकीपूर्वीच राष्ट्रवादीशी हातमिळवणी केल्याची चर्चा उल्हासनगरात आहे. उल्हासनगर शहराचे माजी आमदार पप्पू कलानी हे तुरुंगातून बाहेर आल्यानंतर उल्हासनगर शहरातली राजकीय गणितं मोठ्या प्रमाणात बदलली आहेत. आधी भाजपसोबत असलेल्या कलानी गटानं पप्पू कलानी हे जेलबाहेर येताच तब्बल 32 नगरसेवकांसह राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यातच पप्पू कलानी यांनी वैयक्तिक भेटीगाठी घेत सध्या उल्हासनगर शहर अक्षरशः पिंजून काढलं आहे. त्यामुळं सध्याचं वातावरण पाहता उल्हासनगर महापालिकेवर राष्ट्रवादीची एकहाती सत्ता येईल, अशी एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र या सगळ्यानं महापालिकेत सध्या सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या गोटात काहीसं असुरक्षित वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळं शिवसेनेनं एक पाऊल पुढे टाकत राष्ट्रवादीला निवडणुकीपूर्वीच एकटे येण्याचं आवाहन केलं होतं. त्याला राष्ट्रवादी, म्हणजेच कलानी परिवारानेही भविष्याचा विचार करत होकार दिला आहे.
दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेत्यांची नुकतीच एक प्राथमिक बैठक झाली, ज्यात निवडणुका एकत्र लढण्याचा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला शिवसेनेकडून शहरप्रमुख राजेंद्र चौधरी, माजी सभागृह नेते धनंजय बोडारे, नगरसेवक अरुण आशान तर राष्ट्रवादीकडून पप्पू कलानी यांचे सुपूत्र ओमी कलानी, माजी महापौर पंचम कलानी, माजी नगरसेवक मनोज लासी उपस्थित होते. या बैठकीत एकत्र येण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं, तर बाकी गोष्टी पुढच्या बैठकीत ठरवल्या जाणार आहेत. या सगळ्याबाबत शिवसेनेचे शहरप्रमुख राजेंद्र चौधरी यांना विचारलं असता, राज्यातील महाविकास आघाडीप्रमाणे आम्ही स्थानिक पातळीवरही एकत्र येण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले. तसंच राष्ट्रवादीची वाढती ताकद पाहता शिवसेनेनं एकत्र येण्यासाठी पुढाकार घेतला का? असा प्रश्न त्यांना विचारला असता, पप्पू कलानी जेलबाहेर असल्यानं राष्ट्रवादीची ताकद वाढली असेल, मात्र शिवसेनेला त्याचा काही फरक पडत नसून यापूर्वीही पप्पू कलानी शहरात असताना आम्ही निवडणुका लढवल्या आहेत, मागील निवडणुकीत तर भाजपनं सत्तेचा दुरुपयोग करून निवडणुका लढवल्या, तरीही शिवसेनाच सर्वात मोठा पक्ष ठरला, असं त्यांनी स्पष्ट केलं. तर महापौरपदाबाबत विचारलं असता, ज्याचे जास्त नगरसेवक येतील त्याचाच महापौर होईल, असं म्हणत भविष्यात आमचे वरिष्ठ जो काही निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल, असंही राजेंद्र चौधरी म्हणाले.
या सगळ्याबाबत राष्ट्रवादीत गेलेल्या कलानी परिवाराचे सदस्य आणि पप्पू कलानी यांचे सुपुत्र ओमी कलानी यांना विचारलं असता, आत्ता एकत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला असून हा निर्णय वरिष्ठ पातळीवरून झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसंच एकत्र लढलो, तर दोन्ही पक्षांचा फायदाच होईल, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, या दोन पक्षांच्या आघाडीत महाविकास आघाडीचा घटकपक्ष असलेला काँग्रेस मात्र अद्याप सहभागी झालेला नाही. काँग्रेसनं याआधीच 'एकला चलो रे'ची भूमिका घेतल्यानं आम्ही त्यांना विचारात घेतलं नसल्याचं शिवसेना आणि राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. मात्र काहीही असलं, तरी उल्हासनगर शहराचं राजकारण येत्या निवडणुकीत 'कलानी' नावाभोवतीच फिरणार, हे मात्र स्पष्ट आहे.