मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत, याबाबतची माहिती शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. महाराष्ट्र सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचं दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.


29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवतीर्थावर (शिवाजी पार्क, दादर) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत.


गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठं यश मिळालं होतं. महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजपने 23 तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला.


त्याअगोदर 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरु करण्यापूर्वी उद्धव यांनी या दौऱ्याचे आयोजन केले होते. राम मंदिर हा शिवसेना-भाजप युतीचा लोकसभा निवडणुकीपूर्वीचा महत्त्वाचा अजेंडा होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते.