मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा पूर्णाकृती पुतळा मुंबईत उभारण्यात येणार आहे. पुतळ्याची जागा बदलल्याने नव्याने परवानगी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे पुतळयाचे बाळासाहेबांच्या जयंतीदिनी लोकार्पण होण्याची शक्यता नाही. मात्र बाळासाहेबांच्या जयंतीचे औचित्य साधून आज पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. यानंतर आता पुढील परवानगी घेऊन पुतळा लवकरच उभारला जाईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा 17 नोव्हेंबर 2012 रोजी मृत्यू झाला. बाळासाहेब ठाकरे यांचा पुतळा गेटवे ऑफ इंडिया येथील महाराष्ट्र पोलीस मुख्यालयाच्या समोर उभारण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या स्थायी समितीचे तत्कालीन अध्यक्ष यशोधर फणसे यांनी ऑक्टोबर 2015 रोजी गटनेत्यांच्या बैठकीत मांडला होता. त्याला तत्कालीन महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंजुरी देऊन पालिका आयुक्तांच्या मंजुरीसाठी पाठवला होता. पालिका आयुक्तांच्या अभिप्रायानंतर हा प्रस्ताव महाराष्ट्र पुरातत्व कमिटी, मुंबई अर्बन आर्टस् कमिशन, तसेच राज्य सरकाराच्या गृह विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
याच दरम्यान पुतळा उभारण्यासाठी जागा अपूरी पडणार असल्याने स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी छत्रपती शिवाजी महाराज वस्तूसंग्रहालय आणि नॅशनल गॅलरी ऑफ मॉर्डन आर्टस इमारतीसमोरील चौकात बसवावा, अशी सूचना केली. त्याप्रमाणे प्रस्ताव बनवण्यात आला. त्यावर चौकात आणि दुभाजकाच्या जागी पुतळा उभारता येत नाही. पुतळा उभारणीसाठी विशेष बाब म्हणून पालिका सभागृहाची परवानगी आवश्यक असल्याचा अहवाल प्रशासनाने दिला. त्याप्रमाणे आज पालिका सभागृहात विशेष बाब म्हणून बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. याबाबत बोलताना आज बाळासाहेब ठाकरे यांच्या नव्या पुतळ्याच्या जागेचा प्रस्ताव सभागृहात मंजूर झाला आहे.
बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. आजपासून खऱ्या अर्थाने पुतळा उभारण्यासाठी परवानगी मिळवण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. आता लवकरच राज्य शासन, कला संचालक महाराष्ट्र राज्य (सर जेजे स्कुल ऑफ आर्टस्) यांचे ना हरकत प्रमाणपत्र, प्रमुख वास्तूविशारद महाराष्ट्र शासन, पोलीस आयुक्त वाहतूक, कार्यकारी अभियंता वाहतूक व समन्वय यांचे ना हरकत प्रमाणपत्र, हेरिटेज कंझर्व्हेशन कमिटी यांची परवानगी घेतली जाईल. या विभागांची परवानगी मिळताच पुतळ्याचे अनावरण केले जाईल.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बाळासाहेब ठाकरेंच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या नव्या जागेचा प्रस्ताव मंजूर
मनश्री पाठक, एबीपी माझा
Updated at:
22 Jan 2020 10:34 AM (IST)
बाळासाहेब ठाकरे यांची येत्या 23 जानेवारीला जयंती आहे. या जयंतीचे औचित्य साधून हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -