शिर्डी : कांद्याच्या दरात सातत्याने घसरण होत आहे. कांदा लिलावात प्रतिकिलो एक ते दोन रुपये दर मिळत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी टोकाचे पाऊल उचलत आहेत. कांद्याचे भाव सतत घसरत असल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला असून शासनाने यात लक्ष घालण्याची मागणी पुढे येताना दिसत आहे.
कांद्याला प्रतिकिलो एक रुपये दर मिळाल्याने श्रीरामपूर तालुक्यातील एका शेतकऱ्याने विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने त्याचे प्राण वाचले तर अनेक ठिकाणी कांदा मोफत देण्याची वेळ बळीराजावर आली आहे. मात्र सातत्याने कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. उन्हाळी कांद्याची आवक सुरु झाल्यानंतर दिवसागणिक दरात कमालीची घसरण होत आहे. एक नंबर कांदा 900 रुपये प्रति क्विंटल तर दोन आणि तीन नंबरचा कांद्याला अवघा दोनशे ते तीनशे रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. यामुळे वाहतूक खर्च निघत नसल्याने शेतकरी मेटाकुटीला आले आहेत. राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची व्यथा पाहता मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहेत.
काही कृषी उत्पन्न बाजार समित्या शेतकऱ्यांच्या खर्चात कपात व्हावी यासाठी गोणीऐवजी लूज कांदा लिलाव करण्याचा पर्याय अवलंबत आहेत. उत्पादन वाढल्याने आणि एकाच वेळी कांद्याची आवक होत असल्याने दरात घसरण होत असल्याचं बाजार समितीचं म्हणणं आहे.
एककडे ऊसाची तोड होत नसल्याने शेतकरी गर्तेत सापडला असताना भाजीपाला तसंच द्राक्षे, टरबूज आणि कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने शेती करुन काय फायदा अशीच भावना शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
बुलढाण्यात शेतकऱ्याने दर न मिळाल्याने 200 क्विंटल कांदा मोफत वाटला
कांद्याला भाव मिळत नसल्याने हवालदिल झालेल्या बुलढाण्यातील शेगावच्या एका शेतकऱ्याने 200 क्विंटल कांदा मोफत वाटला. कैलास नारायण पिंपळे असे या हतबल शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी आपला कांदा खामगाव आणि शेगावच्या बाजारात नेला होता. मात्र भाव तर सोडाच कांदा कुणी घ्यायलाही तयार नसल्याने हतबल होऊन हा कांदा परत आपल्या घरी आणला. कांदा पडून खराब होईल म्हणून पिंपळे यांनी कांदा घेऊन जाण्यासाठी नागरिकांना आवाहन केलं. मोफत कांदे देत असल्याचं कळताच अवघ्या काही मिनिटांत ते घेण्यासाठी नागरिकांची झुंबड उडाली होती.
संबंधित बातम्या
...म्हणूनच शेतकऱ्याला 'राजा' म्हणतात! भाव मिळत नसल्याने दोनशे क्विंटल कांदा मोफत वाटला
Onion Price News : सरकारला फुकट कांदा द्यायचा का? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचा नाफेडला सवाल