Pravin Darekar on supriya sule : सरकार पुरस्कृत दंडेलशाहीला भाजप घाबरणार नसल्याचे वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar)यांनी केले. स्मृती इराणी यांच्या दौऱ्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसने केलेल्या आंदोलनावर दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. सुप्रिया सुळे (supriya sule ) या हात तोडण्याची भाषा करत आहेत, पोलिसांनी याची चौकशी करुन कारवाई केली पाहिजे. शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात अशी वक्तव्य कशी केली जाऊ शकतात. पोलीस या सगळ्याची चौकशी करुन कारवाई करणार का? असा सवालही यावेळी दरेकर यांनी केला.


शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसून आले


शरद पवारसाहेब यांनी संभाजीराजेंना राज्यसभेसाठी पाठींबा देऊ म्हटले होते, मग आता शिवसेना अशी भूमिका कशी घेऊ शकते. शिवसेनेचे संभाजीराजे यांच्याबद्दलचे प्रेम दिसले असल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. संभाजीराजे यांची महाविकास आघाडी फसवणूक करत असल्याचेही दरेकर यावेळी म्हणाले. दरम्यान, भाजपनं याबाबत कोणतीही भूमिका मांडली नाही. त्यामुळे ही भाजपची चाल आहे असं म्हणणं चुकीचं असल्याचे ते म्हणाले. 
  
 चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नाहीत


रोहित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर केलेल्या टीकेवरही दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. चंद्रकांतदादांवर टीका करण्याइतके रोहित पवार मोठे नसल्याचे दरेकर यावेळी म्हणाले. पवार साहेब किंवा दुसरे पवार आहेत त्यामुळे रोहित पवार यांनी चंद्रकांतदादा यांना सल्ला देऊ नयेत असेही ते म्हणाले. चंद्रकांतदादांनी हे सगळं करायला सांगितलं आहे का? मग टीका कशाला करता. रोहित पवार हे बुजुर्गपणाचा आव आणत आहेत असेही दरेकर म्हणाले.


काय म्हणाले होते रोहित पवार 


चंद्रकांत दादा मूळ विषय होता महागाईवरील निवेदन स्वीकारण्याचा. पण नेहमीप्रमाणे तो भरकटवण्यासाठी तुमच्या पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलण्याचं किळसवाणं कृत्य केलं. त्याविरोधात मग चिडलेल्या महिलांनी महिषासुरमर्दिनीचं रूप घेतल्यावर आता आपण अंडं.. अंडं म्हणून कांगावा करतो. महागाई हा मूळ विषय अजून किती दिवस असा भरकटवण्याचा प्रयत्न करणार आहात? संस्कृतीबाबत बोलायचं तर फडणवीस साहेबांवर चप्पलफेकीचा प्रयत्न झाला तेंव्हा त्याचा आम्ही निषेधच केला. 'चुकीच्या गोष्टीचा निषेध आणि चांगल्या कामाचं कौतुक केलंच पाहिजे,' ही आम्हाला साहेबांची नेहमीच शिकवण असते. असे रोहित पवार म्हणाले होते. आपण मोठे नेते आहात आणि अनेक कार्यकर्ते आपला आदर्श घेत असतात. महिलांवर हात उचलण्याचं आपण समर्थन करत असाल तर समाजात चुकीचा मेसेज जाऊ शकतो असे रोहित पवार म्हणाले होते.