Onion Price News : यावर्षी नाफेड संपूर्ण देशातून अडीच लाख टन कांद्याची खरेदी करणार आहे. तर त्यापैकी एकट्या महाराष्ट्रातून सव्वा दोन लाख टन कांदा खरेदी करणार आहे. पण सध्या नाफेडकडून कमी दरात शेतकऱ्यांच्या कांद्याची खरेदी केली जात आहे. 10 व 12 रुपये प्रति किलोने कांद्याची खरेदी केली जात आहे. याबाबत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. कमी दरात शेतकऱ्यांनी कांदा देऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचा कांदा 30 रुपये प्रति किलो दराने खरेदी करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं केली आहे.

  
दरम्यान, महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी कांदा संघटनेच्या या आवाहनाला एकमताने प्रतिसाद दिल्यास कोणत्याही आंदोलनापेक्षाही मोठे यश येईल. नाफेडकडून आपोआप कांद्याला भाववाढ मिळेल असे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं म्हटले आहे. राज्यात नाफेड एकच भाव देण्याऐवजी यावर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यांसाठी वेगवेगळा भाव ठरवून दिला जात आहे. ही पद्धत शेतकऱ्यांसाठी पूर्णपणे चुकीची असून काही ठराविक दलालांना फायदा होत असल्याचे हाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं म्हटले आहे.


नाफेडचा शेतकऱ्यांकडील कांदा खरेदीचा प्रति किलोचा दर 


धुळे आणि नाशिकसाठी  12 रुपये 
अहमदनगर आणि बीडसाठी 10 रु 83 पैसे 
उस्मानाबाद जिल्ह्यासाठी 10 रुपये 50 पैसे 
औरंगाबादसाठी  10 रुपये 
पुण्यासाठी  9 रुपये 97 पैसे


या दरात शेतकऱ्यांकडून कांद्याची खरेदी केली जात असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं दिली आहे. शेतकऱ्यांनी या भावात एक किलोही कांदा नाफेडला देऊ नये तरच नाफेडकडून होणारी शेतकऱ्यांची लूट थांबेल असं संघटनेनं म्हटले आहे. दरम्यान, आमदार, खासदार, मंत्री, केंद्रीय मंत्री, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री, पंतप्रधान यापैकी कोणीही कांद्याच्या प्रश्नावरती बोलायला तयार नाही. त्यामुळे आपणच महाराष्ट्रातील सर्व कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी एक वज्रमुठ तयार केली आणि ठामपणे निश्चय केला की 10 व 12 रुपये प्रति किलो या भावात नाफेडला कांदा द्यायचा नाही. तर नाफेड ही संस्था नक्कीच राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांपुढे गुडघे टेकवील आणि शेतकऱ्यांच्या कांद्याला जास्तीचा दर देईल असे मत महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेनं व्यक्त केले आहे.


महत्त्वाच्या बातम्या: