Buldhana News Updates : वर्षभर कष्ट करुन कधी आस्मानी तर कधी सुलतानी संकटाचा सामना शेतकऱ्याला करावा लागतो. अनेक अडचणींवर मात करत उभं केलेलं पिक अनेकदा आस्मानी संकटाच्या बळी पडतं तर कधी आस्मानी संकट आलं नाही म्हणून व्यवस्थित हाताशी आलेलं पिकं सुलतानी संकटाच्या कचाट्यात सापडतं. शेतकरी माल बाजारात घेऊन जातो तर त्या मालाला कवडीमोल किंमत मिळते. अशात शेतकऱ्यांसमोर अनेकदा पर्याय उरत नाहीत. तरीही शेतकऱ्याला राजा असं संबोधलं जातं. त्याचं कारण म्हणजे त्याची उदारता. अशाच एका शेतकऱ्याच्या उदारतेचा परिचय बुलढाण्यात आला आहे.
कांद्याला भाव मिळत नसल्याने आणि उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेगाव येथील गणेश पिंपळे नावाच्या शेतकऱ्याने हतबल होऊन आपला 200 क्विंटल कांदा अक्षरशः मोफत वाटला. मोफत कांदा घेण्यासाठी अवघ्या काही मिनिटांत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
शेगाव येथील गणेश पिंपळे या शेतकऱ्याने आपल्या दोन एकर शेतात कांद्याचा पीक घेतले होते. जवळपास दीड लाख रुपये उत्पन्न खर्च झाला. पीकही चांगलं आलं पण बाजारपेठेत कांद्याला घ्यायला कुणी व्यापारी तयार नव्हतं. जे व्यापारी कांदा घेणार ते भाव देत नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्याने आपला दोनशे क्विंटल कांदा आपल्या घराजवळ अक्षरशः टाकून दिला आणि नागरिकांना मोफत घेऊन जाण्याचं आवाहन केलं. अवघ्या काही मिनिटांत नागरिकांनी कांदा संपवला असून या शेतकऱ्याचं जवळपास अडीच लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.
गणेश पिंपळे यांनी सांगितलं की, मी दोन एकर कांदा केला होता. कसाबसा तो पिकवला. मार्केटमध्ये आणला तर व्यापारीच मिळाला नाही. यासाठी दोनेक लाख रुपये खर्च लागलाय. कांदा फुकट वाटला. मी आता कर्जबाजारी झालोय, पुढं काय करायचं हा प्रश्न आहे, असं पिंपळे यांनी सांगितलं.
एकीकडे नागरिकांना किरकोळ बाजारात कांदा घ्यायचा म्हटलं तर आज प्रतिकिलो 15 ते 20 रुपये मोजावे लागत आहे. मात्र बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या कांद्याला मात्र खरेदी करायलाही कुणी तयार नाहीय. 'राजा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शेतकऱ्याला अनेकदा उत्पादनाला लागलेला खर्चही निघत नाही. मग हतबल होऊन हा 'राजा' कधी टोमॅटोचा लाल चिखल करतो, कधी कांदे फेकून देतो किंवा लोकांना फुकटात वाटून टाकतो.