सिंधुदुर्ग : तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाच सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहेत.  तसेच कोकणातील गावागावात मांडावर साजरा होणारा शिमगा उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता चाकरमानी जिल्ह्यात दाखल होत असताना सीमेवर आरोग्य विभागाकडून तपासणी केली जात आहे. 


जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांच्या निर्देशाने जिल्ह्याच्या सीमेवर खारेपाटण आणि करुळ येथे आजपासून आरोग्य पथक तैनात करण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासन व जिल्हा आरोग्य विभाग महसूल प्रशासन,पोलीस प्रशासन यांच्या वतीने जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्या नागरिकांची तपासणी केली जात आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने जिल्हा सीमेवर खारेपाटण आणि करूळ येथे आरोग्य पथक तैनात केले आहे. 


परराज्यातून तसेच पराजिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांना त्यांचा कोविड टेस्ट अहवाल सोबत ठेवणं आवश्यक आहे.  कोणाला सर्दी, ताप ,खोकला किंवा कोरोना संसर्गाची प्राथमिक लक्षणे आढळून आल्यास त्या व्यक्तीला जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करणे, सदर व्यक्ती कंटेन्मेंट झोन किंवा हॉटस्पॉट भागातून आली आहे का याची माहिती घेणे, ट्रॅव्हल हिस्ट्री चेक करणे, थर्मल गन, प्लस ऑक्सिमिटरचा वापर करून प्रवाशांची तपासणी करण्याचे काम खारेपाटण, करुळ चेक पोस्ट येथील आरोग्य पथकाकडून सुरू आहे. 


साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने निर्देश 
तळकोकणात म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचं सावट असल्यामुळे साध्या पद्धतीने शिमगोत्सव साजरा करण्याचे प्रशासनाने निर्देश दिले आहेत. मुंबई, पुणे तसेच परजिल्ह्यातील चाकरमान्याना गावात येण्यासाठी कोरोना रिपोर्ट बंधनकारक असणार आहे. होळीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह असणं आवश्यक आहे. 72 तासांपूर्वीचा कोरोना निगेटिव्ह अहवाल आवश्यक आहे. तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भाव पाहता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत. 


कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता चाकरमन्यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात येऊ नये, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे. त्यानंतरही गावी येण्याच्या निर्णयावर ठाम असणाऱ्या लोकांसाठी काही नियम घालून देण्यात आले आहेत. त्यानुसार कंटेन्मेंट झोनमधून येणाऱ्या चाकरमान्यांना कोरोना टेस्ट बंधनकारक आहे. जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी 72 तास आधीचा निगेटिव्ह कोरोना चाचणी अहवाल दाखवणे बंधनकारक आहे. 


कोकणात गणपती आणि होळी हे दोन मोठे सण साजरे केले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या, रोबाट, गोमुचे नाच निघतात. शिमगोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी मुंबई, पुणे या शहरातील लोक मोठ्या प्रमाणावर कोकणातील आपल्या गावी येतात. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव जिल्ह्यात रोखण्यासाठी प्रशासनाने चाकरमान्यांनी येऊ नये असं आव्हान केलं आहे.


होळीच्या काळात कोकणात गर्दी होण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र शिमगोत्सवाच्या काळात जिल्ह्याबाहेरील लोकांची तपासणी ग्राम नियंत्रण समितीकडे सोपवण्यात आली आहे. एखाद्याला कोरोनाची लक्षण असल्यास त्याला शिमगोत्सवाट सामील होता येणार नाही याची दक्षता ग्राम नियंत्रण समितीकडे सोपविण्यात आलं आहे. पालखी घरोघरी नेण्यास मज्जाव करण्यात आला आहे. तर कोकणात येणाऱ्या गावकऱ्यांचे गावातही स्कॅनिंग केले जाणार आहे. तसेच गावात रोंबाट, नमन,खेळे या कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.