रत्नागिरी : शिमगा अर्थात शिमगोत्सव (होळी) कोकणी माणसाचा जीव की प्राण. या शिमगोत्सवाची कोकणी माणूस मोठ्या आतुरतेनं वाट पाहत असतो. शिमगोत्सवासाठी जगाच्या कानाकोपऱ्यात असलेला कोकणी माणूस आपल्या कुटुंबासह आपल्या मुळगावी येतो. ऐरवी गावी आल्यानंतर ग्रामदेवतेच्या चरणी कोकणी माणूस आवर्जून जातो. पण, शिमगोत्सवात ग्रामदेवताच घरी येणार असल्यानं त्याचा आनंद हा गगनात मावेनासा होतो. यावेळी हक्कानं कोकणी माणूस आपल्या ग्रामदेवतेसमोर व्यक्त होतो. देवासमोर गाऱ्हाणं घालत त्याच्याकडे सर्वकाही सुरळीत पार पडू दे असं साकडं घालतो. पण, यंदाच्या शिमगोत्सवात कोरोनाची चर्चा जोरात सुरू आहे. एकंदरीत काय परिणाम होईल? त्यावर उपाय काय? असे अनेक प्रश्न विचारले जात आहेत. ऐरवी स्वत:साठी देवाकडे साकडं घालणाऱ्या कोकणी माणसानं संपूर्ण मानव जातीचं या कोरोनापासून बचाव करं. कोरोनाचा नायनाट कर असं गाऱ्हाणं (साकडं) घातलं आहे. शिवाय, पारंपरिक पद्धतीनं गाणी गात देवाची महती, कथा देखील सांगितली जाते. काही भागांमध्ये त्याला जत असं देखील म्हटलं जातं. या गाण्यांमधून देखील सध्या कोकणी माणूस कोरोनापासून सर्वाचं रक्षण कर असं गाऱ्हाणं ( साकडं ) आपल्या ग्रामदेवतेला घालत आहे. सध्या हे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती देखील मिळत आहे.



कोकणात शिमगोत्सवाची धुम
कोकणात शिमोत्सवाची धूम जोरात सुरू आहे. घराघरांमध्ये पालखी येत असल्यानं यावेळी मोठा उत्साह सर्वांमध्ये पाहायाला मिळत आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात नोकरी-धंद्याला गेलेला कोकणी माणूस आता आपल्या मुळगावी दाखल झाला आहे. ढोल- ताशांच्या गजरात पालखी नृत्य देखील रंगताना दिसत आहे. पण, यामध्ये देखील कोकणी माणूस कोरोनाबाबत जागृक असलेला दिसून येत आहे. कारण, शिमगोत्सवात शिंपणे मोठ्या जल्लोषात साजरं केलं जातं. पण, आपली जबाबदारी ओळखत यावर्षी मात्र शिंपणे साध्या पद्धतीनं करण्याचा निर्णय एकमतानं घेतला गेला आहे. रत्नागिरी जिल्ह्यात संगमेश्वर, कसबा आणि फणसवनेसह अनेक गावांमध्ये होणारा शिंपणे उत्सव साध्या पद्धतीने करण्याचा निर्णय घेतला गेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं गेलं आहे.


कोरोनाचा पर्यटनावर परिणाम
कोकणात मोठ्या प्रमाणावर पर्यटक दाखल होतात. मार्च ते एप्रिलपर्यतचा काळ इथल्या व्यवसासिकांसाठी महत्त्वाचा असतो. पण, कोरोनामुळे पर्यटकांची संख्या कमालीची घसरली आहे. त्याचा परिणाम हा इथल्या छोट्या- मोठ्या व्यवसायावर होताना दिसत आहे.


संबंधित बातम्या :


मराठवाड्यासह विदर्भात अवकाळी पावसाचा तडाखा; गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान


Coronavirus | एसटी महामंडळाला कोरोनाचा फटका, एकाच दिवशी दीड कोटींचं नुकसान


Coronavirus : कोरोनामुळे डाळ उद्योगाला भरभराटीचे दिवस