जळगाव :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक उद्योग डबघाईला आलेले असताना जळगावच्या डाळ उद्योगाला मात्र भरभराटीचे दिवस असल्याचं पाहायला मिळत आहे. जागतिक पातळीवर डाळींचा मागणीत वाढ झाल्याने जळगावहून निर्यात होत असलेल्या डाळ उद्योगात तीस टक्क्याने वाढ झाली आहे. त्यामुळे डाळ उद्योजकात समाधानच वातावरण असल्याच पाहायला मिळत आहे.

गेल्या काही वर्षात विविध कारणांनी जळगावच्या डाळ उद्योगाला मोठी घरघर लागल्याचं पाहायला मिळत होतं. शासनाच्या निर्यात बंदीचा निर्णयाने अनेक डाळ उद्योजक  मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले होते. मात्र कधी नव्हे ते कोरोना व्हायरसमुळे डाळ उद्योगाला चांगले दिवस आल्याचे पाहायला मिळत आहे.

कोरोना व्हायरस हा मांसाहाराच्या माध्यमातून पसरत असल्याची अनेकांना शंका आणि भीती आहे. या भीती पोटी जागतिक पातळीवर अनेकांनी मांसाहार कमी करीत शाकाहार घेणे पसंत केला आहे. त्याचबरोबर डाळींमध्ये असलेले पोषक घटक आणि सुरक्षित आहार म्हणून भारतीय डाळींचाकडे पाहिले जात असल्याने त्याचा परिणाम म्हणून जागतिक पातळीवर डाळींचा मागणीत मोठी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे.

गेल्या महिना भरापासून जळगावच्या डाळ निर्यातीत तीस टक्क्यांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यात यंदा पाऊसही चांगला झाल्याने  डाळींचे उत्पादन देखील मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्याने, विदेशात भारतीय डाळींना निर्माण झालेली मागणी केवळ डाळ उद्योगासाठीच नव्हे तर शेतकऱ्यांना आणि देशाच्या अर्थ व्यवस्थेला बळकटी देणारी ठरण्याची शक्यता आहे. कोरोनाचा प्रभाव आणखी काही दिवस कायम राहिला तर डाळींचा मागणीत आणखी वाढ निर्माण होऊन डाळींचा भाव ही वाढण्याची शक्यता असल्याने कोरोनाच संकट डाळ उद्योगाला मात्र बळकट करणारं ठरू शकते.