एक्स्प्लोर
निवडणुकीनंतरच्या शरद पवारांच्या एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीतले 10 महत्त्वाचे मुद्दे
विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट झाल्यापासून राज्याच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. यादरम्यान पडद्यामागे अनेक अशा घटना घडल्या, ज्याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. त्यापैकी काही गोष्टींचा खुलासा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी केला आहे.
मुंबई : गेल्या काही दिवसांत राज्याच्या राजकारणात खूप मोठी उलथापालथ झाली आहे. यादरम्यान पडद्यामागे अनेक अशा घटना घडल्या, ज्याबद्दल महाराष्ट्रातील जनता अनभिज्ञ आहे. त्यापैकी काही गोष्टींचा खुलासा स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यानी केला आहे. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले.
1. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदासाठी कसं मनवलं?
राज्याचं मुख्यमंत्रीपद स्वीकारण्यास उद्धव ठाकरे अजिबात तयार नव्हते, अशी माहिती राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी दिली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांना शब्द दिलाय की, राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री होईल. त्यामुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवणे ही माझी जबाबदारी आहे, असं उद्धव ठाकरे वारंवार सांगत होते, असं शरद पवारांनी सांगितलं. मात्र स्वत: मुख्यमंत्री बनण्याची उद्धव ठाकरे यांची तयारी नव्हती. तर शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी यांच्या महाविकास आघाडीच्या सरकारचा कारभार सुरळीत चालण्यासाठी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री बनने आवश्यक होतं. तिन्ही पक्षांची मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंच्या नावाला एकमताने सहमती होती. उद्धव ठाकरे तयार नसल्याने, मी त्यांना त्यांच्या भाषेत मुख्यमंत्री पद स्वीकारण्याचे आदेश दिले. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारली, असं शरद पवारांनी सांगितलं.
2. महाराष्ट्रातील सत्तेचा रिमोट कंट्रोल कोणाकडे?
शरद पवार म्हणाले की, सत्तेचा रिमोट कंट्रोल माझ्याकडे आहे, असं म्हणण योग्य नाही. राज्याच्या कारभार कसा चालेल? याचा किमान समान कार्यक्रम शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीने एकत्रित बसून तयार केला आहे. राज्याच्या प्रमुखाला सहकार्य करावं, त्यांनी सल्ला मागितला तर तो द्यावा. सतत राज्याच्या प्रमुखाला सल्ले दिल्यास, त्यांना प्रभावीपणे कारभार करणे कठीण होऊ शकतं. त्यामुळे राज्याचं नेतृत्व एकाच व्यक्तीच्या हाती असायला हवं आणि आता राज्याचं नेतृत्व उद्धव ठाकरेंच्या हाती आहे, असं माझं मत असल्याचं शरद पवारांनी सांगितंलं. पवार म्हणाले की, उद्धव ठाकरे यांचा स्वभाव मला माहित आहे. मुंबई महापालिकेसारख्या संस्था त्यांच्या हातात आहेत. त्यांच्या कामाची पद्धत मला माहित आहे. प्रशासन यंत्रणेला विश्वासात घेऊन काम केल्यास, त्याचा चांगला रिझल्ट मिळतो. दैनंदिन प्रशासनामध्ये हस्तक्षेप करण्याचा उद्धव ठाकरेंचा स्वभाव नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे उत्तम प्रशासक म्हणून काम करतील यात शंका नाही, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला.
3. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी का केली?
राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन करुन राज्यात राजकीय भूकंप केला. या राजकीय भूकंपाबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, भाजपसोबत हातमिळवणी करताना अजित पवारांनी त्यांच्यासमोर एक अट ठेवली होती. अजित पवार फडणवीसांना म्हणाले होते की, आजच्या आज जर तुम्ही शपथ घेणार असाल, तर आम्ही हे सगळं करण्यास तयार आहोत.
4. अजित पवारांना शरद पवारांचा पाठिंबा होता का?
अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. याबद्दल लोकांना असे वाटते की, मला याची पूर्ण कल्पना असेल, किंवा अजित पवारांच्या या अशा कृतीला माझा पाठिंबा असेल. परंतु हे साफ चुकीचं आहे. मला त्याबद्दल काहीच माहिती नव्हती. पवार म्हणाले की, सुरुवातीच्या वेळी मला अजित पवारांनी एकच गोष्ट सांगितली होती. अजित पवार एके दिवशी मला म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस काहीतरी बोलायचं म्हणतात. मी जाऊ का?" राजकारणात संवाद ठेवला पाहिजे, या भूमिकेतून मी अजित पवारांना फडणवीसांशी बोलण्यासाठी होकार दिला. परंतु दुसऱ्या दिवशी असं काही घडेल, याची मला कल्पना नव्हती.
5.शिवसेनेसोबत आघाडी करायचीच होती तर प्रत्येक मुलाखतीत आपण विरोधी बाकावरच बसणार आहोत असे का म्हणालात?
विधानसभा निवडणुका झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षात बसणार असल्याची जाहीर भूमिका आम्ही घेतली होती. जनतेने आम्हाला विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला होता, म्हणून मी तशी भूमिका घेतली होती. आम्ही सत्तेच्या अपेक्षेनं पावलं टाकत नाही, हे दाखवायचं होतं. म्हणून विरोधी पक्षात बसण्याचा जनादेश आम्हाला दिलेला आहे, हे वारंवार सांगत होतो. आम्ही सत्तेच्या दिशेनं पावलं टाकत नाही आहोत, असा आम्हाला विशेष करुन शिवसेनेला संदेश द्यायचा होता.
6. शिवसेनेला पाठिंबा मिळवून देण्यासाठी काँग्रेसचं मन कसं वळवलं?
काँग्रेसचा शिवसेनेच्या विचारधारेला नेहमीच विरोध होता. मात्र सोनिया गांधींसोबत मी काही मुद्द्यांवर चर्चा केली. शिवसेनेसोबत जाण्यासाठी काँग्रेसच्या राष्ट्रीय पातळीवर थोडा विरोध होता. त्यावेळी मी सोनिया गांधी यांना काही घटना सांगितल्या. इंदिरा गांधी यांनी लागू केलेल्या आणीबाणीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पाठिंबा दिला होता, याची आठवण मी त्यांना प्रथम करुन दिली. आणीबाणीनंतर झालेल्या राज्यातील निवडणुकीत काँग्रेसला पाठिंबा देऊन एकही उमेदवार उभा न करण्याची महत्त्वाची भूमिका बाळासाहेबांनी घेतली होती. बाळासाहेबांनी काँग्रेससाठी अनेक महत्त्वाच्या भूमिका घेतल्याचं मी त्यांना सातत्याने सांगितलं, असं शरद पवारांनी सांगितलं.
त्यानंतर राष्ट्रपती निवडणुकीत प्रतिभाताई पाटील यांना शिवसेनेनं जाहीर पाठिंबा दिला होता. त्यावेळी शिवसेनेशी बोलण्याची जबाबदारी काँग्रेसने माझ्यावर सोपवली होती. एनडीएमध्ये असतानाही शिवसेनेने प्रतिभा पाटील आणि प्रणव मुखर्जी यांना पाठिंबा दिला होता. ठाणे महापालिकेत बाळासाहेबांनी कशा प्रकारे काँग्रेसला सहकार्य केले होते, याची आठवण मी सोनिया गांधींना करुन दिली. तसेच राज्यातील काँग्रेस नेत्यांची अस्वस्थताही सोनिया गांधी यांना कळाली असावी. सगळीकडून शिवसेनेसोबत जाण्याचं वातावरण तयार झालं हे लक्षात आल्यानंतर सोनिया गांधी तयार झाल्या असाव्यात, असं शरद पवारांनी सांगितलं.
7. भाजपकडून राष्ट्रपतीपदाची खरंच ऑफर होती का?
महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टी आणि शेतीच्या नुकसानासंबंधित चर्चा करण्यासाठी शरद पवार यांनी नरेंद्र मोदींची दिल्लीत भेट घेतली होती. या भेटीत शरद पवारांना मोदींनी राष्ट्रपतीपदाची ऑफर दिली होती, अशा अफवा उडाल्या होत्या. या सर्व चर्चा आणि अफवांचं शरद पवारांनी खंडण केलं. परंतु पवारांनी या भेटीबद्दल एक मोठा गौप्यस्फोटदेखील केला.
शरद पवार म्हणाले की, अतिवृष्टीसंदर्भात बोलणं झाल्यानंतर पंतप्रधानांनी थांबण्यास सांगितलं आणि म्हणाले की, आपण एकत्रित काम केल्यावर आनंद होईल. परंतु मी ती ऑफर नाकारली. मी त्यांना सांगितले की, आपले व्यक्तिगत संबंध उत्तम आहेत ते राहतीलही पण आपण एकत्र काम करणं मला राजकीयदृष्ट्या शक्य नाही.
8. मी पुन्हा येईन, हे वाक्त किंवा भूमिका देवेंद्र फडणवीसांना भोवली असं वाटतं का?
निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची देवेंद्र फडणवीसांची भाषणं पाहा. त्यांनी भाषणांमधून अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की मी पुन्हा येईन, शरद पवार हे इतिहासजमा झाले आहेत. आता केवळ माझं नाव आहे. यामध्ये फडणवीसांचा 'मी'पणा जाणवतो. पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. ते सत्तेत होते. लोकांचा असा पाठिंबा मिळाल्यानंतर आपण पक्षवाढीसाठी काम करायचं असतं. परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये 'मी'पणाचा दर्प जाणवतो. त्यांची भाषण पाहा. त्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्व काही, बाकीचे सगळे तुच्छ आहेत, असा अविर्भाव होता. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही, त्यांना 'मी'पणा आवडत नाही. त्यांना विनम्रता आवडते.
9. फडणवीस अजूनही होते तिथेच
शरद पवार म्हणाले की, फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते, परंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मोठं स्थान निर्माण करता आलं नाही. ते अजून तिथेच आहेत. मी म्हणजे महाराष्ट्र, मी म्हणेल तोच महाराष्ट्र ही त्यांची भूमिका राज्यातील जनतेला मान्य नाही. त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला. परंतु त्याचं श्रेय फडणवीसांना जात नाही. त्यामागे मोदींचा चेहरा आहे.
10. फडणवीसांवर भाजपचे राज्यासह दिल्लीतले नेते नाराज
शरद पवार यांनी सांगितले की, फडणवीस यांच्यावर भाजपचे राज्यातले नेते नाराज आहेत. आज मी दिल्लीत भाजपच्या अनेक नेत्यांना भेटलो, चर्चा झाल्या. त्यामधून मला एक गोष्ट कळली आहे की, फडणवीसांवर भाजपचे दिल्लीतले अनेक नेतेदेखील नाराज आहेत.
वाचा : अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार
वाचा : शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार
80 तास आणि शरद पवारांचा पॉवर प्ले! | ABP Majha
VIDEO पाहा : वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम
अजित पवार म्हणतात मी बंड केलं नव्हतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्रीडा
महाराष्ट्र
राजकारण
Advertisement