Raj Thackeray  Sharad Pawar : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे नास्तिक असल्याचा दावा केला होता. त्यावर शरद पवार यांनी मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असं म्हटले. या वेळी शरद पवार यांनी माझ्या निवडणूक प्रचाराचा नारळ कुठं फुटतो, हे बारामतीकरांना विचारा, असेही म्हटले होते. त्यानंतर पवारांच्या प्रचाराचा पहिला नारळ कुठं फुटतो याची चर्चा सुरू झाली. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कधीही आपल्या श्रद्धांचे जाहीर प्रदर्शन केले नाही. पवार यांनी आपल्या धार्मिक आस्था या नेहमीच सार्वजनिक जीवनापासून दूर ठेवल्यात. त्यामुळे शरद पवार हे नास्तिक की आस्तिक अशी कधीतरी चर्चा होत असते. मात्र, वस्तुस्थिती काहीशी वेगळी असल्याचे समोर आले आहे. बारामती तालुक्यातील कन्हेरी येथील मारुती मंदिरावर पवार कुटुंबीयांची श्रद्धा असल्याचे म्हटले जाते. या मंदिराचे पुजारी महादेव शिंदे यांनीदेखील याला दुजोरा दिला आहे. पवार कुटुंबीयांनी वर्षानुवर्षे कन्हेरी येथील मारुती मंदिरावर श्रद्धा ठेवली असल्याचे त्यांनी सांगितले.


या मंदिरातूनच प्रत्येक निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ केला जातो. केवळ निवडणुकीपुरतं पवार कुटुंब या मंदिरात येतं नाही. अनेकदा सवड मिळेल तेव्हा पवार कुटुंबीय या मारुती मंदिरात येतात अशी माहिती मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिली.


शरद पवारांसंदर्भात काय म्हणाले होते राज ठाकरे


राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत शरद पवारांवर आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे. महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे.