Solapur : सोलापूर पुणे हायवेवर एक दुर्घटना घडली आहे. सोलापूर पुणे हायवेवर वरवडे टोल नाका परिसरात आज पहाटे भर पावसात, चालत्या फटाक्यांच्या ट्रकवर वीज पडून फटाक्यांचे मोठे स्फोट झाल्याने ट्रक जळून खाक झाला आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. हा फटाक्यांचा ट्रक पुणे मार्गाहून सोलापूरकडे जात असताना चालत्या ट्रकवर वीज पडली. यामुळे ट्रक मधील फटाके पेटले आणि एका मागोमाग एक फटाक्यांचे स्फोट होऊ लागल्याने पडत्या पावसात ट्रक पेटला.
ट्रक चालकाची सावधानता :
या दुर्घटने दरम्यान, ट्रक चालकाने सावधानता बाळगत ट्रक सोडल्याने सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, हा ट्रक संपूर्णपणे फटाक्यांनी भरलेला असल्या कारणाने जवळपास दोन तास सोलापूर पुणे हायवेवर फटाक्यांची आतिषबाजी सुरुच होती. वीज ट्रकवर पडल्याने हा ट्रक संपूर्णपणे जळून खाक झाला आहे.
दोन तास वाहतूककोंडी :
या अग्नितांडवामुळे दोन्ही बाजूची वाहतूक साधारण दोन तास थांबली होती. त्यामुळे वाहनचालकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा, पोलीस पथके, आरोग्य पथके वेळेत दाखल झाली. संपूर्ण आग विझवल्यानंतर मात्र हायवेवरची वाहतूक व्यवस्था पुन्हा सुरळीतपणे सुरु करण्यात आली. मात्र, या हायवेवर घडलेल्या या फटाक्यांच्या स्फोटाने अवघा परिसर मात्र दणाणून निघाला होता.
दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे गारपीट आणि पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
महत्वाच्या बातम्या :
- Maharashtra Rain : राज्यात एकीकडे उन्हाचा कहर तर दुसरीकडे अवकाळीचा तडाखा; पिकांसह घरांचंही नुकसान
- ST Workers Strike Updates : कामावर परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली; सदावर्तेच्या अटकेनंतर मोठी वाढ
- Nashik Onion : संकट श्रीलंकेत, फटका नाशिकच्या कांदा निर्यातदारांना; निर्यात घटल्यानं भाव घसरण्याची भीती