Sharad Pawar On Raj Thackeray : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray)यांनी केलेल्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. शरद पवार हे नास्तिक आहेत. त्यांचा मंदिरातला फोटो बघितलाय का? असा आरोप राज ठाकरेंनी केला होता. यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, 'मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही, असं पवार म्हणाले. मनसे भाजपची बी टीम आहे का? असं विचारलं असता पवार म्हणाले की, भाजपविरोधात एकही शब्द ते बोलले नाहीत याचा अर्थ काय होतो. 


शरद पवारांच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे 10 मुद्दे



  • फुले शाहू आंबेडकर यांचाच उल्लेख केला जातो असा आरोप केला जातो. कारण हे महापुरुषही शिवरायांचा आदर्श घेऊन काम करायची. 

  • मी परवाच्या अमरावतीच्या भाषणात 15 मिनिटं शिवरायांवरच बोललोय. 

  • पुरंदरे यांच्याबद्दल मी बोललो ते मी लपवत नाही. दादोजी कोंडदेव यांचा उल्लेख होता त्याला माझा सक्त विरोध होता. तेव्हाही होता आणि आता ही विरोध आहे. 

  • जेम्स लेनचं लिखाण गलिच्छ होतं. त्याला ज्यांनी माहिती पुरवली ती योग्य नव्हती.

  • मी नास्तिक नाही, मात्र ही माझ्या आस्थेचं प्रदर्शन करत नाही

  • राज ठाकरेंच्या भाषणात महागाई आणि सर्व सामान्य यांचा उल्लेख किंचीतही नाही. भाषणात सर्वसामान्यांचा उल्लेख नव्हता. 

  • राष्ट्रवादी हा संपवणारा पक्ष असा त्यांनी उल्लेख केला मात्र महाराष्ट्राच्या जनतेने त्यांची दखल घेतली

  • 3 मे पर्यंत लाऊडस्पीकर हटवण्यासंदर्भात सरकार विचार करेल

  • सोनिया गांधी यांचा मुद्दा उपस्थित केला. पंतप्रधान पदासाठी आमचा विरोध होता. व्यक्ती म्हणून आमचा विरोध नव्हता. आजही आम्ही एकत्र आहोत.

  • राज्यात वीजेचा प्रश्न आहे. कोळसा टंचाईचा प्रश्न आहे. यावेळी उष्णतेची लाट आहे. यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जात आहे


शरद पवारांसंदर्भात काय म्हणाले होते राज ठाकरे
राज ठाकरे यांनी काल ठाण्याच्या सभेत शरद पवारांवर आरोप करताना म्हटलं होतं की, शरद पवार हे स्वत: कोणत्याही धर्माला मानत नाहीत. मग ते त्यांच्या पद्धतीने राजकारण करतात, त्यांच्या पक्षामुळेच महाराष्ट्रात जातीय राजकारण फोफावतंय. शरद पवारांच्याकडे घेण्यासारखे अनेक चांगले गुण आहेत, पण त्यांच्या जातीय राजकारणाचे काय करायचं असा सवाल त्यांनी केला. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून राज्यात जातीयतावाद वाढला. शरद पवार सांगतात हा महाराष्ट्र फुले-शाहू-आंबेडकरांचा आहे. पण ते कधीच शिवरायांचे नाव घेत नाहीत. कारण त्यांना मुस्लिम मतांची काळजी आहे. महाराष्ट्र जातीच्या चिखलात अडकला आहे. पवारांसारख्या बुजूर्ग राजकारण्यांनी या राज्यातील जातीय भेद संपवले पाहिजेत. पण तेच लोकांना यात अडकवतात. घराघरात ज्यांनी शिवचरित्र पोहोचवलं ते बाबासाहेब पुरंदरे यांच्यासाठी सॉफ्ट टार्गेट होते. शरद पवारांना इतिहास नाही, तर जात बघायची आहे. यांच्यामुळेच मराठा-ब्राह्मण वाद वाढतोय. हे त्यांच्या राजकारणासाठीच सुरू आहे. 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह | ABP Majha