Pune News : आधी वीजखांबावरून घरासाठी 21 हजार रुपयांची थेट वीजचोरी, आणि मग चोरी उघड करणाऱ्या वरिष्ठ तंत्रज्ञासोबत मारपीट करणाऱ्या सुनील जाधव या कंत्राटी कर्मचाऱ्यास महावितरणच्या सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. यासोबतच जाधव विरुद्ध वीजचोरी केल्याप्रकरणी कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील जुन्नरमध्ये हा प्रकार उघडकीस आला आहे. नेमका प्रकार काय?


वीजखांबावरून केबलद्वारे थेट वीजचोरी सुरु असल्याचे आढळले


याबाबत माहिती अशी की, महावितरणच्या मंचर विभाग अंतर्गत नारायण उपविभागमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याच्या मु. पो. नंबरवाडी वारुळवाडी (ता. जुन्नर) येथील राहत्या घरी नारायणगावचे सहायक अभियंता ऋषिकेश बनसोडे व वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांनी वीजयंत्रणेची तपासणी केली असता त्या ठिकाणी वीजखांबावरून केबलद्वारे थेट वीजचोरी सुरु असल्याचे आढळून आले. पंचनामा केल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने राहत्या घरी गेल्या 24 महिन्यांपासून एकूण 1752 युनिटची म्हणजे 19 हजार 130 रुपयांची वीजचोरी केल्याचे निर्दशनास आले. वीजचोरी व दंडासह एकूण 21 हजार 130 रुपयांचे वीजबिल घराचे मूळ मालक यांना देण्यात आले आहे. या वीजचोरी प्रकरणी नारायणगाव पोलीस ठाण्यात सुनील जाधव विरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 मधील कलम 135 नुसार फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


महावितरणमधील कंत्राटी सेवा तात्काळ समाप्त


दरम्यान घरातील वीजचोरी उघडकीस आल्यानंतर कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव याने महावितरणचे वरिष्ठ तंत्रज्ञ रामदास बांबळे यांच्यासोबत नारायणगाव येथे मारपीट केली, तसेच गंभीर स्वरुपाचे सार्वजनिक गैरवर्तन केले. त्यामुळे प्राईमवन वर्कफोर्स कंत्राटदार संस्थेकडून कंत्राटी कर्मचारी सुनील जाधव विरुद्ध बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे. त्याप्रमाणे जाधव याची महावितरणमधील कंत्राटी सेवा देखील तात्काळ समाप्त करण्यात आली आहे.


महावितरण विभागातील कर्मचारी एकमेकांत चांगलेच भिडले


पुण्यातील जुन्नर मध्ये महावितरण विभागातील दोन कर्मचारी एकमेकांत चांगलेच भिडलेत. मारहाण झालेले कर्मचारी हे कायमस्वरूपी (पर्मनंट) तर मारहाण करणारा हा कंत्राटी कर्मचारी आहे. कंत्राटी कर्मचारी चोरीची वीज वापरायचा, याची खबर कायमस्वरूपी कर्मचाऱ्याला लागली. मग वरिष्ठांच्याच सोबतीने त्याने हे बिंग फोडले, शिवाय अन्य ग्राहकांना ही असे चोरीचे कनेक्शन जोडून दिल्याचा आरोप कायमस्वरूपी कर्मचाऱ्यांनी केला. याच रागात जाऊन कंत्राटी कर्मचाऱ्याने थेट हाणामारी सुरू केली. दोघांनी मध्यस्थी करत हे भांडण सोडवलं. वरिष्ठ पातळीवर या प्रकाराची चौकशी सुरू आहे.