मुंबई : काळजी करु नका, सरकार आपलंच स्थापन होईल, असा विश्वास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आमदारांना दिला आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार दुपारी आमदारांच्या भेटीसाठी पवईतील हॉटेल रेनेसाँमध्ये आले होते. या भेटीत उद्धव ठाकरे यांनी पवारांशी चर्चा केली. त्यानंतर दोघांनीही राष्ट्रवादीच्या आमदारांशी संवाद साधला.


शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी नेत्यांशी संवाद साधला. यावेळी सरकार आपलंच स्थापन होणार असून काळजी करु नका, असा विश्वास या नेत्यांनी आमदारांना दिला. सोबतच विरोधकांच्या आरोपांकडे लक्ष न देण्याचेही आवाहन त्यांनी आमदारांना केले. आमदारांच्या फोडाफोडीचं आव्हान कसं रोखायचं यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची शक्यता आहे. त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली असून, उद्या निकाल येण्याची अपेक्षा आहे. यावरही तिन्ही पक्षांचे लक्ष असणार आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत हे सोबत आहेत.

काय म्हणाले शरद पवार -
तुमची काही अडचण आहे का? किंवा तुमच्यावर कुणाचा दबाव आहे का? असा थेट सवाल शरद पवार यांनी उपस्थित आमदारांना विचारला. यावर आपल्याला अजित पवारांचा फोन आल्याचं काही आमदारांनी यावेळी सांगितलं. मात्र, आपण तुमच्याबरोबर असल्याचा विश्वास या आमदारांनी शरद पवारांना दिला आहे.

धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षांचे नेते साशंक
धनंजय मुंडे यांच्याशी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी वेगळी चर्चा केली. धनंजय मुंडे यांच्या भूमिकेबाबत दोन्ही पक्षाचे नेते साशंक असल्याचे बोलले जात आहे. कारण, अजित पवार यांनी शपथविधीला बोलावलेले आमदार हे धनंजय मुंडे यांच्या निवासस्थानी असल्याची माहिती आहे. शिवाय, अजित पवारांच्या शपथविधीनंतर धनंजय मुंडे काही काळ नॉट रिचेबल असल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. अजित पवारांच्या बंडामागे धनंजय मुंडे यांचा हात असल्याचीही चर्चा आहे. त्यामुळंच धनंजय मुंडे यांच्याशी वेगळी चर्चा केल्याची सुत्रांची माहिती आहे.

संबंधित बातम्या -

30 तासानंतर अजित पवार सोशल मीडियावर अॅक्टिव्ह, तासाभरात केले 21 ट्वीट

हे चित्र आयुष्यभर लढण्याची, संघर्षाची प्रेरणा देईल; सुप्रिया सुळेंनी स्टेटसमधून व्यक्त केल्या भावना

EXPLAINER VIDEO | अजित पवारांच्या नाराजीचं कारण काय? पवारांसोबत किती आमदार आहेत? | ABP Majha