मुंबई : शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या सरकार राज्यामध्ये स्थापन होईल, असे चित्र दिसत असतानाच अचानक शनिवारी (23 नोव्हेंबर) सकाळी राज्यात भाजपाने सत्ता स्थापनेचा दावा केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, तर राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी कोणीतीही प्रतिक्रिया दिलेली नव्हती. मात्र आता अजित पवार पुन्हा 30 तासानंतर सोशल मीडियावर 'अ‍ॅक्टिव्ह' झाले असून त्यांनी आपले ट्विटरवर त्यांनी आपली माहिती ( बायो) बदलली आहे. तसेच त्यांनी अभिनंदनाचे ट्वीट स्वीकारले असून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजप नेत्यांचे आभार मानले आहे.

उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलेल्या अजित पवार यांनी रविवारी (24 नोव्हेंबर) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. शनिवारी (23 नोव्हेंबर) उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यावर नरेंद्र मोदी यांनी अजित पवारांचे अभिनंदन केले होते. त्याला उत्तर देताना अजित पवार यांनी पंतप्रधान नरेद्र मोदी यांचे आभार मानले. त्याचबरोबर महाराष्ट्रातील जनतेच्या भल्यासाठी कठोर परिश्रम घेणारे स्थिर सरकार आम्ही देऊ, असेही वचन त्यांनी ट्विटच्या माध्यमातून केले आहे.


अजित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राजनाथ सिंह, पियूष गोयल, स्मृती इराणी, निर्मला सीतारामन,गजेंद्रसिंह शेखावत, सदानंद गौडा, भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा, रामदास आठवले या सर्वांचे त्यांनी आभार मानले आहेत. अजित पवारांनी राष्ट्रवादीविरोधात बंड करत भाजपशी हातमिळवणी केल्यानं सर्वांना धक्का बसला आहे.

EXPLAINER VIDEO | अजित पवारांच्या नाराजीचं कारण काय? पवारांसोबत किती आमदार आहेत? | ABP Majha