मुंबई : उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी शपथ घेतल्यानंतर पवार परिवारात फूट पडल्याचे समोर आले आहे. अजित पवारांनी पुन्हा परत यावं यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांच्यासह अनेक नेत्यांनी आर्जवं करून झाली आहेत. यात आता आमदार रोहित पवार यांची भर पडली आहे. रोहित पवारांनी अजित पवारांना उद्देशातून एक फेसबुक पोस्ट लिहीत अजित पवारांना परत 'स्वगृही' येण्याची भावनिक विनंती केली आहे.


रोहित पवार यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, लहानपणापासून साहेबांना पाहत आलो आहे. प्रश्न राजकीय असो की कौंटुबिक असो साहेब कधी खचून जात नाहीत. माझे आजोबा अप्पासाहेब पवार गेल्यानंतर वडील राजेंद्र दादांना धीर देणारे साहेब मी पाहिले आहेत आणि अजितदादांचे वडील अनंतराव पवार गेल्यानंतर अजितदादांना सावरणारे देखील साहेबच होते, असे रोहित यांनी म्हटलं आहे.

अजितदादांच्या वडिलांच्या पश्चात दादांच्या लहानपणापासून त्यांना वडिलांचे प्रेम देणारे साहेबच होते. तसेच आदरणीय पवार साहेबांवर अडचण आल्यानंतर खंबीर भूमीका घेणारे अजितदादा देखील आपण पाहिले आहेत. प्रश्न कौटुंबिक असो की राजकीय खचून जाणं हे साहेबांच्या डिक्शनरीत नाही, असे त्यांनी म्हटलं आहे.

हे देखील वाचा -  काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे; सुप्रिया सुळेंचे अजित पवारांना भावनिक आवाहन

आजच्या घडामोडी पाहताना जूनं चित्र कायम तसच असावं. अजितदादांनी साहेबांचे निर्णय मान्य करावेत आणि स्वगृही परत यावं असं मनापासून वाटतं. साहेब राजकारण आणि कुटुंब कधीच एकत्र करत नाहीत व ते करणार देखील नाहीत, असेही रोहित म्हणाले आहेत.


पण कुठेतरी सर्वसामान्य घरातून एक व्यक्ती 'पवार साहेब' होतो. सर्वसामान्यांच्या आवाज होतो आणि अखेरपर्यंत लढत राहतो तेव्हा या देशातल्या अहंकारी शक्ती तो आवाज दाबू पहात आहेत अशा वेळी कुटुंबाचा एक घटक म्हणून व्यक्तिशः मला असं वाटतं की आपण सर्वांनी साहेबांच्या सोबत राहायला हवं.

लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येईल पण यात हक्काची माणसं दूरावू नयेत असं व्यक्तिश: वाटतं, असे रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे : सुप्रिया सुळे
सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला भाऊ अजित पवार यांना केले आहे. अजित पवारांच्या या निर्णयामुळं संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला असून, राष्ट्रवादी आणि त्यात पवार कुटुंबाला हा मोठा धक्का मानला जातोय. या पार्श्वभूमीवर शिवसेना आणि राष्ट्रावादीने संयुक्त परिषद घेत आपली भूमिका मांडली. यात अजित पवारांचा निर्णय हा वैयक्तीक असल्याचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.

आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे.