एबीपी माझाशी बोलताना पडळकर म्हणाले की, अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताना पाहिल्यावर धक्का बसला पण तो सुखद धक्का होता. पण जे झालं ते महाराष्ट्राच्या हिताचं आहे. अजित पवारांचा भाजपमध्ये येण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे, असे ते म्हणाले. मात्र निवडणूक लढतांना असं काही होईल असा अजिबात अंदाज नव्हता. तसेच शिवसेना ही राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जाऊ शकेल हे ही कधी वाटलं नव्हतं, असे देखील पडळकर म्हणाले.
राजकारणात काहीही घडू शकतं हे यावरुन सिद्ध झालं आहे. मी प्रवासात असताना घाटात होतो. त्यावेळीस फोन आले की शपथविधी सुरू आहे. तेव्हा फोनवर शपथविधी पहिला, असे त्यांनी सांगितले. बारामतीतल्या मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांना स्थिर सरकार देण्यासाठीच अजित पवारांनी असा निर्णय घेतला असेल, असेही ते म्हणाले.
अजित पवारांनी सहज नाही तर सर्व विचारांती हा निर्णय घेतला असणार. आज लोकांच्या भावना स्फोटक असतील पण हळू हळू कमी होतील, असेही पडळकर म्हणाले.
विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी महायुतीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांचा तब्बल 1 लाख 66 हजारांनी त्यांचा पराभव केला होता. निवडणुकीत पडळकर यांचे डिपॉझिट जप्त झाले होते. यानंतर "आमच्या येथे डिपॉझिट जप्त करून मिळेल" अशा आशयाचे मजकूर छापलेले फलक देखील बारामतीत लावण्यात आले होते.
तसेच विजयानंतर अजित पवार म्हणाले होते की, मुख्यमंत्री बारातमतीत येऊन म्हणाले होते की गोपीचंद पडळकर आमचा ढाण्या वाघ आहे. मात्र आता त्या ढाण्या वाघाचं मांजर झालंय का बघावं, असा टोला अजित पवारांनी लगावला होता.