Raja Patil Passes away : ज्येष्ठ तमाशा कलावंत शाहीर राजा पाटील काळाच्या पडद्याआड..
Tamasha artist Raja Patil Passes away : शाहीर राजा पाटील यांनी 40 वर्ष लोकनाट्य सेवेत तमाशा कलावंत आणि वगनाट्य लेखक म्हणून सेवा केली.

Raja Patil Passes away : नावाजलेल्या तमाशामध्ये विद्रोही लेखणीने तमाशा क्षेत्रातून करमणुकीच्या माध्यमातून लोकप्रबोधन करणारे शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांचे वयाच्या 70 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने तमाशा क्षेत्रावर दु:खाचे सावट पसरले आहे.
शाहीर राजा पाटील यांनी 1990 च्या दशकात तमाशा आणि शाहीरी लोककला महाराष्ट्रभर सादर करुन लोककलेचा जागर केला. तसेच काळू बाळू तमाशा मंडळ, गणपत व्ही.माने चिंचणीकर, दत्त महाडीक पुणेकर, रघुवीर खेडकर, काताबाई सातारकर, या तमाशांना वगनाट्य दिली आणि ती महाराष्ट्रभर गाजली. तसेच, माणूस माणसाचा वैरी, बापू बिरु वाटेगावकर, कृष्णा मिळाली कोयनेला अशी नाटकंही शाहीर राजा पाटील यांनी लिहून अजरामर केली.
शाहीर राजाराम यशवंत पाटील उर्फ राजा पाटील यांच्याविषयी :
1970 नंतरच्या लोकनाट्य तमाशा परंपरेतील सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ गावाचे मराठा कुटुंबात जन्माला आलेले शाहीर राजा पाटील एक नामांकित आणि आवलिया कलाकार.
सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ गावी राजा पाटील यांचा जन्म 1 जानेवारी 1946 साली झाला. लोकनाट्य तमाशा व्यवसायात गेल्या पन्नास वर्षांपासून कलावंत, वगनाट्य लेखक, कवी, शाहीर आणि सरदार म्हणून ते कार्यरत राहिले.
शाहीर राजा पाटील यांनी 1968 साली वयाच्या 21व्या वर्षी 'रक्ताची आण' आणि ' आब्रुचा पंचनामा ' ही ग्रामीण नाटके स्वतः लिहून गावातंच हौशी नाट्य मंडळात सादर केली.
काळू-बाळू लोकनाट्य तमाशात पहिल्यांदा 'राजा हरिश्चंद्र' या वगात रोहिदासाची भूमिका मिळाली आणि त्याच वेळी त्यांच्या कलेला खऱ्या अर्थाने वाव मिळाला.
शाहीर राजा पाटील यांनी 1978 साली लोकशाहीर राजा पाटील तमाशा मंडळ, कवठेमहांकाळ या स्वतंत्र तमाशा फडाची निर्मिती करून सांगली जिल्ह्यातील लोककलावंतांना एकत्रित केले आणि झाडाखालीच लोकनाट्य तमाशा फड उभा केला.
त्यांनी सादर केलेल्या राजकीय विषयावरील 'या टोपी खाली दडलंय काय ?' या वगनाट्याचे लेखन करून त्याचे सादरीकरण केले. पुढे या वगनाट्याला संपूर्ण महाराष्ट्रभर प्रसिद्धी मिळाली.
शाहीर राजा पाटील यांनी 40 वर्ष लोकनाट्य तमाशा सेवेत तमाशा कलावंत आणि वगनाट्य लेखक म्हणून सेवा केल्यानंतर संत तुकोबांच्या विचाराने प्रेरित होऊन ते जीवन जगले.
शाहीर राजा पाटील यांनी सन 2011 साली वारकरी संप्रदायाची माळ घातली आणि अध्यात्माचा वसा कायम स्वीकारून सतत तुकोबांच्या विचारात आणि चिंतनात राहून हा विचार आपल्या पोवाड्यातून पोहोचविण्याचा प्रयत्न सुरू ठेवला.
सन 2020 साली कोरोना महामारीच्या काळात शाहीर राजा पाटील यांनी आपल्या चिंतनातून कोरोनाविषयी जनजागृती व्हावी म्हणून 'कोरोना योद्धा' हा पोवाडा तयार केला. त्याचा पहिला प्रयोग पलूस येथील तमाशा लोककलावंतांच्या कार्यशाळेत सप्टेंबर 2021 मध्ये सादर केला.
शाहीर राजा पाटील यांच्या तमाशा जीवनाचा प्रवास मुलाखतीद्वारे 'चाळ ते माळ' या शीर्षकाखाली ' लोकरंजन' या यूट्यूब चॅनेलच्याद्वारे महाराष्ट्रातल्या रसिकांच्यापर्यंत पोहोचला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha























