मुंबई : गत 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पराभव, नुकतेच झालेल्या लोकसभा निवडणुकीत पुन्हा पराभव झाल्यामुळे भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनावर चर्चा घडू लागल्या. तर, भाजपनेही (BJP) लोकसभेतील पराभवाची कारणमिमांसा करताना मराठवाड्यात पुन्हा एकदा पंकजा मुंडेंना संधी देत भाजपची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येत आहे. भाजपने विधानपरिषदेसाठी (Vidhan Parishad Election) 5 उमेदवारांची नावे जाहीर केली. त्यात पंकजा मुंडेंसह (Pankaja Munde) तीन ओबीसी नेत्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे, मुंडेंसमर्थकांची प्रतिक्षा संपली असून कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा केला जात आहे. विशेष म्हणजे अनेक कार्यकर्ते मुंबईकडेही रवाना झाले होते. मात्र, पंकजा मुंडे नागपूर दौऱ्यावर असल्याने ते परत फिरले आहेत. आता, नागपूरमधून पंकजा मुंडेंनी पत्रकारांशी बोलताना महायुतीच्या मुख्यमंत्रीपदाच्या (Chief Minister) चेहऱ्यावर भाष्य केलं आहे.   


भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे सांत्वन भेटीसाठी पंकजा मुंडे त्यांच्या घरी गेल्या होत्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली. त्यावेळी, महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, विधानपरिषदेच्या उमेदवार असलेल्या पंकजा मुंडेंनी आश्चर्यकारक उत्तर दिलं आहे. 


मागील 15 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगायला माझी पात्रता नाही, असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा यांनी दिलं आहे. कधीकाळी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचं पंकजा यांनी म्हटलं होतं. त्यानंतरच, त्यांच्या नेतृत्त्वाला साईडलाईन करण्यास सुरुवात झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात नेहमीच होत असते. त्यामुळे, विधानपरिषदेसाठी अर्ज दाखल केल्यानंतर पंकजा मुंडेंनी दिलेलं हे उत्तर भुवया उंचावणारं आहे. तर, मंत्रीपदाबाबत विचारले असता, एखाद्या गोष्टीनंतर काहीतरी असते, चर्चा होतेच. प्रत्यक्षात ते उतरेल तेव्हा कळेल, असे म्हणत मंत्रीपदाच्या चर्चेवरही त्यांनी स्पष्टपणे बोलणे टाळल्याचं दिसून आलं. दरम्यान, पंकजा मुंडेंनी विधानपरिषदेसाठी उमेदवारीचा अर्ज भरला, त्याआधी मुंबईतील श्री सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. त्यानंतर, वरळीत माध्यमांशी संवाद साधताना त्या भावूक झाल्याचे दिसून आले होते. 


अर्ज भरण्यापूर्वी पंकजा भावूक


पंकजा मुंडे म्हणाल्या की, मी आजच्या दिवसाची सुरुवात सकारात्मक करत आहे. चांगल्या वाईट काळात मला संधी दिली आहे.  जेपी नड्डा, अमित शाह, पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनुकळे, या सगळ्यांचे आभार मानते. मला प्रतीक्षा करावी लागली, आज लोकांना हवं ते झालं आहे. मला आज जे काही मिळतंय ते पाच जीवांच्या चरणी अर्पण करते. आज ते इकडे असते तर घोषणा दिल्या असत्या. त्यांना मी समर्पित करते, असे म्हणत पंकजा मुंडे विधान परिषदेचा अर्ज भरण्यापूर्वी भावूक झाल्याचे दिसून आले. 


भाजपकडून विधानपरिषदेसाठी कुणाला संधी? 


पंकजा मुंडे
योगेश टिळेकर
परिणय फुके 
अमित गोरखे
सदाभाऊ खोत


हेही वाचा


मुंबईत क्रिकेटचा फिव्हर, सागराशेजारी जनसागर; गर्दीमुळे मुख्यमंत्र्यांचा पोलिस आयुक्तांना फोन