Pune School bus :  काही दिवसांपूर्वी  बसचालक आणि केअर टेकरच्या (Pune School bus ) हलगर्जीपणामुळे चार वर्षांची मुलगी दोन तास बसमध्ये अडकली होती. ही बातमी एबीपी माझाने दाखवली होती. याप्रकरणाची आता पुणे पोलिसांनी दखल घेतली आहे. त्यानंतर शालेय विद्यार्थी वाहतूक हा अतिशय संवेदनशील विषय असून विद्यार्थ्यांच्या सर्व प्रकारच्या सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून शाळा तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बस यांनी स्कूल बस नियमावलीचे काटेकोर पालन करावे, असे निर्देश पुणे शहर पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी दिले.


पोलीस आयुक्त रितेश कुमार म्हणाले. विद्यार्थ्यांची घर ते शाळेदरम्यानच्या वाहतुकीदरम्यान अपघात किंवा इतर प्रकारे जीवितास, शारीरिक, मानसिक धोक्याच्या घटनांना प्रतिबंध व्हावा, यासाठी स्कूल बस नियमावलींचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. स्कूल बसमध्ये मदतनीस (अटेंडन्ट), मुलींची वाहतूक होणाऱ्या स्कूल बसमध्ये महिला मदतनीस असणे बंधनकारक आहे. या बसेसचे वाहनचालक चांगले प्रशिक्षित, नैतिकदृष्ट्या सक्षम, पूर्वेतिहास चांगला असणारे असावेत. या बाबींची खात्री शालेय परिवहन समितीने करणे आवश्यक आहे.


बसचालक आणि केअर टेकरला कामावरुन काढून टाकलं


काही दिवसांपूर्वी  बसचालक आणि केअर टेकरच्या हलगर्जीपणामुळे चार वर्षांची मुलगी दोन तास बसमध्ये अडकली होती. त्यावेळी चिमुकलीचा जीव धोक्यात आला होता. त्यानंतर शाळा प्रशासनाने  बसचालक आणि केअर टेकर यांना कामावरुन काढून टाकलं होतं. त्यानंतर आता पोलिसांनी विशेष मोहिम हाती घेतली आहे. 



रात्री प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या तपासणीसाठी विशेष मोहीम



पुणे शहरात माहिती तंत्रज्ञान कंपन्या आणि काही ठिकाणी रात्रपाळीत काम करणाऱ्या महिला तसेच एकूणच रात्री प्रवास करणारे ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वच प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ऑटोरिक्षा, टॅक्सी आदींच्या तपासणीसाठी पोलीस विभाग, वाहतूक शाखा तसेच परिवहन विभागाने संयुक्त विशेष मोहीम हाती घ्यावी, अशा सूचनाही रितेश कुमार यांनी दिल्या. रात्रीच्या वेळी अडवून अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे मागणे, चोऱ्या, प्रवाशांना मारहाण तसेच अन्य गैरप्रकार घडल्याचे लक्षात घेऊन रात्री नाकाबंदीच्यावेळी सर्व वाहनांची कसून तपासणी करावी. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या वाहनांवर, चालकांवर कठोर कारवाई करावी. फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनांच्या नंबरप्लेट जप्त करणे व वाहने अटकावून ठेवणे आदी कठोर पावले उचलावीत, असेही निर्देश पोलीस आयुक्तांनी दिले. 


हे ही वाचा-


Sushma Andhare : भाजपनेच किरीट सोमय्यांचा व्हिडीओ बाहेर काढला; सुषमा अंधारेंचा हल्लाबोल