TRP अभावी ´सावित्रीजोती´ मालिका बंद होणं दुर्दैव, मालिकेला राजाश्रय देण्यासाठी पुढाकर घ्यावा : प्रा. हरी नरके
महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर आधारीत मालिका ´सावित्रीजोती´ ही टीआरपी अभावी अर्ध्यावरच बंद होणार आहे.यावरुन मालिकेचे संशोधक सल्लागार प्रा. हरी नरके यांनी सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हा मला करंटेपणा वाटतो, असे मत व्यक्त केले आहे.
सातारा : फुले, शाहू, आंबेडकरांच्या महाराष्ट्रात प्रेक्षकांच्या अपुर्या प्रतिसादामुळे 'सावित्रीजोती' ही महात्मा जोतीराव व सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावरील मालिका अर्ध्यावरच बंद होणं दुर्दैवाचे असल्याचे मत मालिकेचे संशोधक सल्लागार प्रा. हरी नरके यांनी समाज माध्यमांवर व्यक्त केले आहे. आपल्या पुर्वजांच्या त्यागाबद्दलची ही बेफिकीरी आणि बेपर्वा वृत्ती म्हणजे सामाजिक करंटेपणा होय अशा भावना त्यांनी पत्रकाद्वारे व्यक्त केल्या. काही दिवसांपूर्वीच दिग्दर्शक, निर्माते महेश टिळेकर यांनी देखील यावरुन प्रेक्षकांना चांगलेच सुनावले होते.
येत्या शनिवारी या मालिकेचा शेवटचा भाग प्रक्षेपित होणार आहे. सुजाण प्रेक्षकांनी ही मालिका उचलून धरलेली असताना महिला व बहुजन समाजाचा अपुरा प्रतिसाद असल्याने नाईलाजाने मालिका बंद करावी लागत आहे. ज्यांच्यासाठी या जोडप्याने सर्वस्वाचा त्याग केला त्यांनीच या मालिकेला पुरेसा प्रतिसाद न देणं हा समाजद्रोह होय.
ते पुढे म्हणाले, निखळ करमणुकीच्या जोडीला ज्ञान, संस्कृती, वर्तमान, जगाचे व जगण्याचे भान वाढवणार्या, रंजनातून सामाजिक प्रबोधन, लोकशिक्षण करणार्या सावित्रीजोती सारख्या मालिकांच्या मागे समाजाने आणि शासनाने उभे राहायला हवे. स्त्रिया आणि बहुजन समाज हेच टिव्हीच्या सर्व मालिकांचे मुख्य प्रेक्षक आहेत. त्यांना शतकांच्या गुलामीतून बाहेर काढणारे सावित्रीजोतीसारखे लोक बहुजनांनाच आपलेसे न वाटणे हा मला करंटेपणा वाटतो.
दशमी क्रिएशनने या दर्जेदार मालिकेची निर्मिती केलेली असून सोनी मराठी वाहिनीने ही मालिका करण्याचे धाडस दाखवले. ओंकार गोवर्धन, अश्विनी कासार, पूजा नायक, मनोज कोल्हटकर यांच्या प्रमुख भुमिका असलेल्या या मालिकेत आजवर जोतीराव-सावित्रीबाईंचे पहिल्या तीस वर्षांतील जीवन-कार्य आणि विचार यांच्यावर प्रकाश टकाण्यात आलेला आहे. आता यापुढच्या शंभर एपिसोडमध्ये त्यांच्या महत्वपुर्ण अशा समाजक्रांतीच्या उपक्रमांचे 40 वर्षांतील योगदान दाखवण्याचे नियोजन होते. दणकट लेखन, कलाकारांचा उत्तम अभिनय, कसदार सादरीकरण, कसबी दिग्दर्शन आणि सर्वोत्कृष्ठ निर्मिती यामुळे ही मालिका अव्वल दर्जाची बनलेली आहे. सावित्री जोती मालिकेला टिआरपी होता, पण तेव्हढा पुरेसा नव्हता. ही बायोपिक असल्याने त्यात हमखास मनोरंजनाचा मसाला भरता येत नव्हता. नरके यांच्या फेसबुक पेजवर सव्वादोन लाख नागरिकांनी सदर पोस्टला भेट देऊन ही मालिका मध्येच बंद न करता चालू ठेवा अशा हजारो प्रतिक्रिया दिल्या.
नरके यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन मालिकेला राजाश्रय देण्यासाठी त्यांनी पुढाकार घ्यावा अशी मागणी केली. भुजबळ यांनी ही मालिका चालू ठेवण्यासाठी आपण आवश्यक तो पुढाकार घेऊ असे आश्वासन दिले.
संबंधित बातमी : TRP नसल्यानं 'सावित्री ज्योती' मालिका बंद! महेश टिळेकर यांचे फेसबुक पोस्टमधून प्रेक्षकांना प्रश्न