पुणे : उरळी कांचनमध्ये (Uruli Kanchan) तुकोबांच्या पालखी  (Sant Tukaram Maharaj) सोहळ्यात यंदा  गोंधळ पाहायला मिळाला. वर्षानुवर्षाची विसाव्याची परंपरा खंडित केल्याने  ग्रामस्थ काही प्रमाणात आक्रमक होते.  या सर्व पार्श्वभूमीवर   संत तुकाराम महाराज संस्थानाने  मोठा निर्णय घेतला आहे.  यंदा परतीच्या प्रवासात उरुळी कांचनमध्ये पालखीचा मुक्काम होणार नाही.देहू संस्थानकडून नेमकं कोणत्या कारणामुळे येथे पालखी थांबणार नाही हे अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही.


यंदा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळा यामध्ये उरुळी कांचन येथील पालखी विसावा यात बदल विश्वस्तांनी केला होता. पालखी परंपरेनुसार गावामध्ये आली नाही तर गावबंद असहकाराची घोषणा करण्यात आली होती. पालखी सोहळा विसाव्यासाठी थांबला नाही म्हणून पालखी सोहळा अडवला होता. यावरुन  वाद झाला आणि पालखी अडवणाऱ्या आठ ते दहा जणांवर गुन्हा सुद्धा दाखल झाला होता. त्यामुळे उरुळी कांचन येथे पालखी न थांबता पुढे लोणी काळभोर या ठिकाणी थांबणार आहे. पालखी सध्या तात्पुरत्या स्वरूपात कदमवाक वस्ती लोणी काळभोर येथे पालखीतळावर परतीचा मुक्काम होणार आहे.  


काय आहे प्रकरण?


आषाढी वारीत पंढरपूरच्या दिशेने जाणारी  जगद्गुरु संत तुकाराम (Sant Tukaram Maharaj)  महराजांची पालखी उरळी कांचनमध्ये (Uruli Kanchan)   अडवण्यात आली होती. सालाबादप्रमाणे उरळीकांचन शहरांमधून पालखी जावी आणि पुढे विश्रांतीसाठी महात्मा गांधी महाविद्यालयाच्या मैदानावर थांबावी यासाठी ग्रामस्थ पुढारी नेते मंडळी आग्रही होते. परंतु पालखी चौकात येण्याअगोदर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामस्थ, पुढारी चौकामध्ये ठिय्या मारून भजन करत बसले होते. पोलीस प्रशासनने त्यांना रस्त्यावरून बाजूला करत पालखीला रस्ता मोकळा करून देण्याचा प्रयत्न केला. ग्रामस्थांचा हा गोंधळ पाहून विश्वस्तांनी नगारा बैलगाड्याचे बैल सोडून विरोध दर्शवला. यामध्ये ग्रामस्थ, पोलीस प्रशासन, व विश्वस्त यांच्यात वादावादी झाली. या वादविवादानंतर पोलीस अधिकाऱ्यांनी स्वतः नगारा रथ ओढत पुढे नेला व नगाऱ्याला बैल जुंपण्यास सांगितले. या गोंधळानंतर पालखी उरुळी कांचन शहरात विसाव्यासाठी न जाता पुढे निघून गेली. वर्षानुवर्षाची परंपरा खंडित झाली. पालखी विसाव्या ठिकाणी न गेल्यामुळे भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे बऱ्याच भाविकांना पालखीचे दर्शन घेता आले नाही. पालखी मार्ग बदलण्याचा निर्णय हा विश्वस्तांनी केला आहे.