मुंबई ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) काल एक फोटो ट्विट केला आणि महाराष्ट्रातलं राजकारण तापलं आहे.  आज त्याच फोटोवर संजय राऊतांनी नवा ट्विट केला आहे आणि भाजपनं फोटोवर दिलेल्या कबुलीची राऊतांनी खिल्ली उडवली. फोटो ट्विट करताना कुणाचंही नाव घेतलं नाही. मात्र भाजपनं (BJP) स्वतःच फोटोतले महाशय महाराष्ट्र अध्यक्ष असल्याचं स्पष्टीकरण दिल्याचं राऊतांनी म्हटले आहे. 


संजय राऊत म्हणाले,  माझ्या ट्विटमध्ये मी कुणाचं नाव घेतलं का, कुणाच्या विरोधात आरोप केले का? नाही. मी फक्त एवढंच म्हटलं की, महाराष्ट्र जळत असताना एक महाशय मकाऊमधे जुगार खेळतायतमात्र भाजप हिट विकेट झालं.. स्वतःच जाहीर केलं ही फोटोतले महाशय त्यांचे महाराष्ट्र अध्यक्ष आहेत. 






संजय राऊतांनी हा फोटो ट्विट करत चंद्रशेखर बावनकुळेंवर गंभीर आरोप केलाय.राऊतांच्या मते, हा फोटो मकाऊमधला आहे. 19 नोव्हेंबरच्या मध्यरात्री मकाऊमधल्या कॅसिनो जुगारात बावनकुळेंनी साधारण साडेतीन कोटी रुपये उडवल्याचा दावा राऊतांनी केलाय. संजय राऊतांनी बावनकुळेंवर असे गंभीर आरोप केल्यानंतर बावनकुळेंनीही ट्विट करत स्पष्टीकरण दिलंय. 


बावनकुळेंचे स्पष्टीकरण


बावनकुळेनी आपण कुटुंबासोबत होतो असं सांगताना एक फोटोही समोर आणला. बावनकुळे म्हणाले, मी मकाऊ येथे ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होतो, तेथील हा परिसर आहे. या हॉटेलच्या ग्राऊंड फ्लोअरवर रेस्टॉरंट आणि कसिनो एकच आहे. जेवण केल्यानंतर मी कुटुंबीयांसह रेस्टॉरंटमध्ये बसलो असताना कुणीतरी काढलेला हा फोटो आहे. 


भाजपचे प्रत्युत्तर


भाजपनंही संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं. भाजपच्या अधिकृत अकाऊंटवरुन आदित्य ठाकरेंचा फोटो ट्विट करण्यात आला. प्रसिद्ध फुटबॉलपटू डेव्हिड बेकम ज्यावेळी भारतात आला, त्यावेळी आदित्य ठाकरेंनी त्याची भेट घेतली होती. त्यावेळचा फोटो समोर आणत भाजपनं थेट आदित्य ठाकरेंवर आरोप केले.आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे त्यांच्या आयुष्यात कधीही जुगार खेळलेले नाहीत. ते ज्या हॉटेलमध्ये सहकुटुंब मुक्कामी होते  तेथील हा परिसर आहे. असो, ज्यांच्या आयुष्याचा जुगार झालाय, त्यांची दृष्टी त्यापलीकडे जाऊ शकत नाही. आम्हाला फक्त एक सांगा संजुभाऊ, आदित्य ठाकरेंच्या ग्लासमध्ये कोणत्या ब्रँडची व्हिस्की होती?


भाजप आणि संजय राऊतांच्या वादात मोहित कंबोज यांची उडी


भाजप आणि संजय राऊतांच्या या वादात मग मोहित कंबोज यांनीही उडी घेतली.बावनकुळे एका रेस्टॉरंटमध्ये कुटुंंबासोबत बसले होते असा दावा कंबोज यांनी केला. राऊतांनी ट्विट केलेल्या फोटोची सीबीआय चौकशी करा अशी मागणी काँग्रेसनं केली. नाना पटोलेंनी अशी मागणी केल्यानंतर चित्रा वाघ यांनीही नाना पटोलेंचे जुने फोटो ट्विट केले. महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमध्ये एकमेकांचे फोटो किंवा व्हिडीओ व्हायरल करण्याची स्पर्धाच सुरु झालीय.


चित्रा वाघ यांनी नाना पटोलेंचे फोटो व्हायरल केले होते. त्यानंतर मोहित कंबोज यांचा एका हॉटेलमधला व्हिडीओ राऊतांनी ट्विट केला होता. मोहित कंबोज यांनी तेजस ठाकरेंचं रेस्टॉरंटमधलं सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केलं होतं. त्यानंतर किरीट सोमय्याही अशाच एका व्हिडीओ प्रकरणानं वादात सापडले . ललित पाटील प्रकरणातही ललित पाटीलचे दादा भुसे आणि उद्धव ठाकरेंसोबतचे फोटो व्हायरल झाले आणि आता बावनकुळेंचा कसिनो खेळतानाचा कथित फोटो राऊतांनी ट्विट केलाय.


हे ही वाचा:


Nitesh Rane : तुमच्या मालकाचा मुलगा संत नाही, राऊतांनी बावनकुळेंचा फोटो शेअर केल्यानंतर नितेश राणेंची टीका