Block on Mumbai - Pune Expressway: जर तुम्ही मुंबई-पुणे द्रुतगती मार्गानं (Mumbai - Pune Expressway) प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. आज दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत एक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे या वेळेत मुंबईकडून (Mumbai News) पुण्याच्या (Pune News) दिशेने जाणारी वाहतूक पूर्णत: बंद राहणार आहे. यासंदर्भात एमएसआरडीसीकडून (MSRDC) माहिती देण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचं काम एमएसआरडीसीकडून केलं जाणार आहे. त्यामुळे हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तसेच, दुपारी 2 वाजल्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहतूक पुन्हा पूर्ववत होणार असल्याचीही माहिती देण्यात आली आहे. 


गँट्री उभारण्यासाठी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर ब्लॉक 


मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज मंगळवारी (21 नोव्हेंबर) दोन तासांचा वाहतूक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यासंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (MSRDC) माहिती देण्यात आली आहे. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर 35/500 किमी अंतरावर हायवे ट्राफिक मॅनेजमेंट सिस्टीमअंतर्गत गँट्री उभारण्याचं काम एमएसआरडीसीकडून केलं जाणार आहे.


ब्लॉकदरम्यान वाहतुकीत बदल 


आज दुपारी मुंबई - पुणे द्रुतगती मगामार्गावर 12 ते 2 या वेळेत वाहतूक ब्लॉक घेतला जाणार आहे. ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद राहणार आहे. तसेच, ब्लॉकदरम्यान मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या हलक्या वाहानांची वाहतूक शेडुंग फाटा येथून वळवली जाणार असून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुना मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील शिंग्रोबा घाटातून द्रुतगती मार्गाच्या मॅजिक पॉईंट येथे पुन्हा मुंबई -पुणे द्रुतगती मार्गावर मार्गस्थ करण्यात येणार आहे. गँट्री बसवण्याचं काम पूर्ण झाल्यानंतर म्हणजेच, दुपारी 2 नंतर मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक पूर्ववत केली जाईल. 


मुंबई-पुणे एक्सप्रेसवे देशातील मोठ्या महामार्गांपैकी एक 


मुंबई-पुणे एक्सप्रेसवेमुळे मुंबई पुणे हा 148 किमी लांबीचा प्रवास 4-5 तासांवरून 2 तासांवर आला. मुंबई-पुणे प्रवास करणारी अनेक खाजगी वाहनं, एस.टी. बसेस, खाजगी परिवहन बसेस तसेच मालवाहू वाहने एक्सप्रेसवेचा वापर करतात. 2002 साली बांधून पूर्ण झालेला हा 94.5 किमी लांबीचा गतिमार्ग मुंबई आणि पुणे या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या दोन शहरांना जोडतो. कोणताही अडथळा, काटरस्ता अथवा वाहतूक नियंत्रक सिग्नल नसलेल्या ह्या मार्गामुळे सुसाट वेगानं प्रवास करण्याची ओळख देशवासीयांना झाली. सध्या हा भारतामधील सर्वात वर्दळीच्या महामार्गांपैकी एक आहे.