नवी दिल्ली : आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहणारे शिवसेना नेते संजय राऊत आपल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. संजय राऊत पुण्यातील लोकमत वृत्तपत्राच्या कार्यक्रमात बोलताना माजी पंतप्रधान इंदिरा गांधीही डॉन करीम लाला याला भेटत असत, असं वक्तव्य केलं. तसेच संजय राऊत मुंबईतील अंडरवर्ल्डबाबत बोलताना म्हणाले की, एक वेळ अशी होती ज्यावेळी मुंबईमध्ये दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि शरद शेट्टी यांसारख्या डॉनचा मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरावर कंट्रोल होता. संजय राऊत म्हणाले की, मुंबईचे पोलीस कमिश्नर कोण होणार आणि मंत्रालयात कोण बसणार? हेदेखील हे डॉनच ठरवत असत. पुढे बोलताना ते म्हणाले की, 'मी अशी व्यक्ती आहे जिने अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला दम देखील दिला होता.'


मुंबईतील एका कार्यक्रमामध्ये आपल्या पत्रकारितेतील अनुभवांबाबत सांगताना संजय राऊत म्हणाले की, 'आज अंडरवर्ल्डमध्ये चिंधीगिरी होत आहे. आम्ही ते अंडरवर्ल्ड पाहिलं आहे, ज्यावेळी डॉन हाजी मस्तान मंत्रालयात जात होता. त्यावेळी मंत्रालयातील लोक त्याच्या स्वागतासाठी बाहेर येऊन उभे राहत असत. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील मुंबईचे डॉन करीम लाला यांना पायधुनी येथे जाऊन भेटत असत.'


पाहा व्हिडीओ : करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद



कोण होता अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला?


करीम लाला याला अब्दुल करीम शेर खान या नावाने ओळखलं जात असून 1930मध्ये तो भारतात आला होता. तो 1960पासून 80च्या दशकापर्यंत दारूची तस्करी, जुगाराचे अड्डे, जबरदस्ती वसुलीचं रॅकेट चालवत होता. त्याचबरोबर सोनं, चांदी आणि हत्यारांच्या अवैध धंदाही करत होता. असं सांगण्यात येतं की, अमिताभ बच्चन यांचा गाजलेला चित्रपट 'जंजीर'मध्ये अभिनेते प्राण यांनी जी भूमिका साकारली होती. ती करीम लालावर आधारित होती. करीम लालाचा मृत्यू 2002मध्ये वयाच्या 90व्या वर्षी झाला.


दरम्यान, मुंबईमध्ये 90च्या दशकापर्यंत अंडरवर्ल्डचा बोलबाला होता. यांपैकी डॉनमध्ये हाजी मस्तान, अबू सलेम, अरुण गवळी आणि दाऊद इब्राहिम ही काही प्रमुख नावं होती. यादरम्यान अधिकाधिक वेळेपर्यंत केंद्रात काँग्रेसचं सरकार होतं. इंदिरा गांधी पहिल्यांदा 1966मध्ये पंतप्रधान बनल्या होत्या, त्यानंतर जनता सरकारच्या प्रयोगानंतर त्या पुन्हा पंतप्रधान बनल्या. त्या 1984 पर्यंत त्यांनी देशाचं पंतप्रधानपद भूषवलं होतं.


या संपूर्ण प्रकरणात काँग्रेस प्रवक्ते चरण सिंह सापरा यांनी सांगितले की, संजय राऊत यांनी जी वक्यव्य केली त्याबाबतचे पुरावे त्यांनी द्यावे. ते म्हणाले की, आम्ही त्यांच्या या वक्तव्यांना दुजोरा देत नाही. तसेच भाजपने सांगितले की, काँग्रेस आणि अंडरवर्ल्डचं फार जुनं नातं आहे. भाजप नेते आशिष शेलार म्हणाले की, संजय राऊत यांनी जी वक्तव्य केली ती खरी असतील तर याप्रकरणी सीबीआय चौकशी होणं आवश्यक आहे.


दरम्यान, महाराष्ट्रात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाआघाडीचं सरकार आहे. अशातच संजय राऊत यांच्या वक्तव्याने महाविकास आघाडीला अडचणीत आणलं असून विरोधी पक्षला टिका करण्यासाठी आयती संधीच मिळाली आहे, असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही.


संबंधित बातम्या : 


करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी; संजय राऊत यांचं स्पष्टीकरण


अंडरवर्ल्ड काँग्रेसला फायनान्स करत होतं? देवेंद्र फडणवसींचा सवाल


तंगड्या तोडण्याची भाषा इथे चालणार नाही; संजय राऊतांचं उदयनराजेंना प्रत्युत्तर