अकोला : अकोला जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्षपदाची निवडणुक उद्या 17 जानेवारीला होत आहे. 53 सदस्यीय अकोला जिल्हा परिषदेत कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. परिणामी अकोला जिल्हा परिषदेवर सत्तेसाठी प्रकाश आंबेडकर आणि महाआघाडीत मोठी रस्सीखेच सुरू आहे. अकोला जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण गटासाठी राखीव आहे. सध्या वंचित बहुजन आघाडीकडे एकही आमदार, खासदार किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नाहीये. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी आंबेडकर आग्रही आहेत.
गेल्या 20 वर्षांपासून अकोला जिल्हा परिषदेवर प्रकाश आंबेडकरांची सत्ता आहे. आता तब्बल पाचव्यांदाही अकोला जिल्हा परिषद ताब्यात घेण्यासाठी सरसावलेत. मात्र, त्यांना बहुमतासाठी दोन जागा कमी पडत आहेत. 53 पैकी 22 जागा जिंकत भारिप-बहूजन महासंघ सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तर चारपैकी तीन अपक्ष भारिपसोबत गेल्यानं भारिपचं संख्याबळ 25 झालंय. मात्र, मॅजिक फिगर असलेला 27 च्या आकड्यासाठी भारिपला दोन सदस्य कमी पडतायेत.


एकूण जागा : 53
भारिप : 22
सेना : 13
भाजप : 07
काँग्रेस : 04
राष्ट्रवादी : 03
अपक्ष : 04
जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे संभाव्य दावेदार.
भारिप-बहूजन महासंघ - ज्ञानेश्वर सुलताने, संजय बावणे
शिवसेना - गोपाल दातकर
काँग्रेस - सुनिल धाबेकर

आंबेडकरांच्या राजकीय अस्तित्वाची लढाई - 
अकोला जिल्हा परिषदेत यापुर्वी शिवसेना, भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र आलेले आहेत. मात्र, सत्ता मिळविण्यात ते अपयशी ठरले होते. यावेळी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीची महाविकास आघाडी राज्यात सत्तेत आलीय. त्यामुळे राज्यातील बदललेल्या सत्ता समिकरणामुळे अकोल्यात भाजपची भूमिका महत्वाची आहे. भाजपचे सात सदस्य जिल्हा परिषदेतील सत्ता स्थापनेत निर्णायक आहेत. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या महाआघाडीची एकत्रित संख्या 20 होत आहे. बहुमताच्या आकड्यासाठी भाजपच्या सात सदस्य कुणाला 'साथ' देतात याकडे राजकीय वर्तुळीचं लक्ष लागलं आहे.

अकोल्याच्या जिल्हा परिषदेची लढाई प्रकाश आंबेडकरांसाठी राजकीय अस्तित्वाची लढाई आहे. अकोल्यातील सत्ता स्थापनेच्या नाट्यामध्ये भाजपच्या संजय धोत्रेंच्या भूमिकेतून जिल्हा परिषदेची सत्ता ठरणार आहे. त्यामुळे अकोला जिल्हा परिषद आंबेडकर राखतात की विरोधक इतिहास बदलतात, याचं उत्तर उद्याच्या निवडणुकीत मिळणार आहे.

संबंधित बातमी - हे सरकार शेतकरी विरोधी, कंगाल आणि दारुड्यासारखे : प्रकाश आंबेडकर

Anandraj Ambedkar | आनंदराज आंबेडकर वंचित आघाडीतून बाहेर | औरंगाबाद | ABP Majha