मुंबई : इंदिरा गांधी अंडरवर्ल्ड डॉन करीम लालाला भेटत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर मग काँग्रेस पक्षाला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? असे सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केले आहेत. फडणवीस यांनी मागणी केली आहे की, काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं द्यावीत.


काल (15 जानेवारी) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी असा दावा केला होता की, माजी पंतप्रधान इंदिरा गांधी मुंबईतल्या पायधुनी परिसरात अंडरवर्ल्ड डॉन करीम लाला याला भेटण्यासाठी येत होत्या. राऊतांच्या या वक्तव्यावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत.


देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलताना म्हणाले की, इंदिरा गांधी मुंबईत करीम लालाला भेटण्यासाठी येत होत्या, यावरुन अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे काँग्रेसने राज्याला आणि देशाला सांगावं की, इंदिरा गांधी खरंच करीम लालाला भेटण्यासाठी येत होत्या का? अशा भेटी होत होत्या तर काँग्रेस पार्टी त्या काळात अंडरवर्ल्डच्या भरवशावर निवडणुका जिंकत होती का? काँग्रेसला अंडरवर्ल्ड फायनान्स करत होतं का? काँग्रेसने या प्रश्नांची उत्तरं तातडीने द्यावीत, अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.


फडणवीस म्हणाले की, छोटा शकील आणि दाऊद इब्राहिम हे महाराष्ट्र सरकार चालवत होतं का? 1960-70 च्या दशकांमध्ये मुंबईच्या पोलीस आयुक्तांची नियुक्ती अंडरवर्ल्डकडून होत होती का? अंडरवर्ल्ड डॉन हाजी मस्तान किंवा इतर डॉन मंत्रालयात यायचे तेव्हा त्यांना सेलिब्रेटिसारखं वागवलं जात होतं का? या सर्व प्रश्नांवर काँग्रेसने खुलासा करावा.


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस खासदार राहुल गांधी आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांना विचारु इच्छितो की, ज्या शिवसेनेसोबत ते महाराष्ट्रात सत्तेत बसले आहेत, त्या शिवसेनेच्या नेत्यांनी कांग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांवर असे आरोप केल्यानंतरही काँग्रेस शिवसेनेसोबत सत्तेत का बसली आहे?


करीम लालाला पठाण नेता म्हणून भेटायच्या इंदिरा गांधी, संजय राऊतांची पत्रकार परिषद | ABP Majha



पाहा काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?